Wednesday, February 27, 2008

जोडी क्‍या बनाई...

जोडी क्‍या बनाई...

वधू-वराच्या जोड्या स्वर्गातच जमतात, असं म्हटलं जातं. मात्र बॉलीवुडमधल्या जोड्या एवढ्या सहजासहजी जमत नाहीत. फक्त नायक-नायिकाच नव्हे तर दोन प्रसिद्ध नायक एका चित्रपटात येणंही इथं दुर्मीळ असतं. अशा परिस्थितीत कमल हसन आणि मोहनलाल हे दक्षिणेतले दोन सुपरस्टार एका आगामी चित्रपटात एकत्र येणं, ही खूप महत्त्वाची घटना आहे. त्या निमित्तानं बॉलीवुडमधल्या कलावंतांच्या जमलेल्या आणि काही कारणांमुळे जमू न शकलेल्या जोड्यांचा घेतलेला हा वेध...
-------------
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे दोन प्रमुख आधारस्तंभ म्हणजे कमल हसन आणि मोहनलाल. हे दोन कलाकार आता चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे त्यांनी एकत्रितपणे "साईन' केलेला "कंदाहार' हा चित्रपट. काही वर्षांपूर्वी झालेल्या विमान अपहरण नाट्यावर हा चित्रपट आधारलाय. मल्याळी आणि तमीळ भाषेत निर्मिल्या जाणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन मेजर रवी करणार आहेत. यापूर्वी काश्‍मीर दहशतवादावरचा त्यांचा "कीर्तीचक्र' आणि दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारलेला "मिशन नाईंटी डेज' या दोन चित्रपटांची बरीच चर्चा झाली होती. चेन्नईतील एका कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी कमल हसन यांनी मोहनलाल यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मेजर रवींनी लगोलग हा धागा पकडून या दोन दिग्गजांशी संपर्क साधला आणि त्यांना आपल्या नवीन चित्रपटासाठी त्यांना करारबद्ध केलं.
लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या दोन कलाकारांनी एकत्र येण्याचा हा अपूर्व योग बऱ्याच काळानं आलाय. हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात डोकावल्यास लोकप्रिय कलावंतांच्या खूप कमी वेळा जोड्या जमल्याचं निदर्शनास येतं. 1950 ते 1970 हा काळ गाजविला तो दिलीपकुमार-राज कपूर आणि देव आनंद या त्रयीनं. परंतु, हे तीन दिग्गज कलावंत एकदाही एका चित्रपटामध्ये एकत्र येऊ शकले नाहीत. राज कपूर आणि दिलीपकुमार "अंदाज' या एका चित्रपटाद्वारे एकत्र आले. पण, दिलीपकुमार-देव आनंद आणि राज कपूर-देव आनंद यांना एकत्रपणे पडद्यावर पाहण्याचा आनंद प्रेक्षकांना काही मिळू शकला नाही. त्या काळात या तिघांचे वेगवेगळे "कॅंप्स' तयार झाल्यामुळे कदाचित ते एकत्र आले नसावेत. मात्र, या तिघांचा काळ ओसरल्यानंतर अचानक लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेल्या अमिताभ बच्चनबाबत सुदैवानं असा प्रकार घडला नाही. हा सुपरस्टार त्या काळातील प्रत्येक लोकप्रिय कलाकाराबरोबर झळकला. (अमिताभ-रजनीकांत ः गिरफ्तार, अंधा कानून), (अमिताभ-विनोद खन्ना ः हेरा फेरी, मुकद्दर का सिकंदर), (अमिताभ-शशी कपूर ः सुहाग, दीवार) आपल्या नंतरच्या पिढीतल्याही अनेक अभिनेत्यांबरोबर अमिताभने पडदा शेअर केला. याला अपवाद आहे तो फक्त आमीर खानचा. वास्तविक अमिताभ-आमीर आणि माधुरी दीक्षित या तिघांना एकत्र घेऊन प्रसिद्ध दिग्दर्शक इंद्र कुमार यांनी "रिश्‍ता' चित्रपटाची घोषणाही केली होती. पण, हा चित्रपट मुहूर्ताच्या पलीकडे जाऊ शकला नाही.
लोकप्रिय कलाकारांच्या जोड्या न जमण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे त्यांचं "स्टार स्टेटस.' ज्या दोन कलाकारांना एकत्र झळकवायचं असतं, त्यांना समान लांबीच्या, समान महत्त्वाच्या व्यक्तिरेखा मिळणं आवश्‍यक असतं. चित्रपट संपल्यानंतर आपण "लूजर' ठरलो, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होण्याची भीती असते. कलाकारांच्या मनातली ही भीती आजतागायत दूर झाली नसल्यानं प्रमुख कलाकार एकत्र येण्यास नाखूश असतात. "अंदाज अपना अपना'च्या यशानंतर प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी शाहरुख खान-आमीर खानला घेऊन एका नवीन चित्रपटाची घोषणा केली होती. पण, हा चित्रपट कधीच सुरू होऊ शकला नाही. खरं तर, या दोन्ही कलाकारांनी वेळोवेळी एकमेकांबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केलीय. परंतु, त्यांच्या "स्टार स्टेटस'ला न्याय मिळेल, असे "रोल' लिहिण्यात लेखक मंडळींना अपयश आलंय.
मोठे कलाकार एकत्र न येण्यामागचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे "सोलो स्टार' म्हणून मिळवलेल्या यशाला अधिक किंमत असते. आमीर खान हा "मल्टीस्टारर' चित्रपटात झळकतो. पण, आपल्या आजूबाजूचे कलाकार "स्टार' नसल्याची तो प्रकर्षानं काळजी घेतो. प्रेक्षक आणि हिंदी चित्रपट व्यवसायाच्या दृष्टीनं विचार केल्यास मोठे कलाकार एकत्र येणं जरूरीचं आहे. लेखक-दिग्दर्शकांनी त्या दृष्टीनं विचार केल्यास मनोरंजनाचं आणखी एक माप प्रेक्षकांच्या पदरी पडेल.

महत्प्रयासानं जमलेल्या जोड्या चित्रपट
अमिताभ बच्चन-दिलीपकुमार शक्ती
राजकुमार-दिलीपकुमार सौदागर
राजकुमार-नाना पाटेकर तिरंगा
अमिताभ बच्चन-नाना पाटेकर कोहराम

प्रेक्षकांना उत्सुकता असूनही न जमलेल्या जोड्या
शाहरुख खान-आमीर खान
अमिताभ बच्चन-आमीर खान
अक्षयकुमार-शाहरुख खान
अक्षयकुमार-हृतिक रोशन

Tuesday, February 26, 2008

आणखी एक प्रयोग!

आणखी एक प्रयोग!

गेल्या वर्षीच्या "भेजा फ्राय'चं यश वेगळ्या वाटेवरच्या सिनेमाची नांदी करणारं होतं. "पॅरलल सिनेमा'च्या नावाखाली ज्या कल्पना दोन दशकांपूर्वी हेटाळल्या गेल्या, त्यांचं आता बऱ्यापैकी स्वागत केलं जात आहे. "मिथ्या' हा चित्रपट याच जातकुळीतला आहे. विशेष म्हणजे, "भेजा फ्राय'च्याच "टीम'नं या चित्रपटाची निर्मिती केलीय. दिग्दर्शक रजत कपूर यांनी या वेळी फक्त विनोदाच्या ट्रॅकवरच आपल्या सिनेमाला मर्यादित ठेवलेलं नाही. पुढच्या क्षणाला काय घडेल, याचा प्रेक्षकाला कसलाही थांगपत्ता लागू न देण्यात दिग्दर्शकाला यश मिळालंय; पण वेगळ्या कल्पनेकडे केवळ प्रयोगाच्याच चष्म्यातून दिग्दर्शकानं पाहणं पसंत केलंय. त्यामुळे हा सिनेमा काही तुकड्या-तुकड्यांमधून मनोरंजन करतो. सुरुवातीला धमाल ट्रॅकवर सुरू झालेला हा सिनेमा उत्तरोत्तर गंभीर होत जातो आणि त्याचा प्रभावही उत्तरोत्तर फिका पडतो. रणवीर शौरीचा अप्रतिम अभिनय आणि त्याला नेहा धुपियानं दिलेली साथ, ही या चित्रपटाची सर्वांत मोठी जमेची बाजू. कपूर यांच्यात एक चांगला दिग्दर्शक दडला आहे. त्याला प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी त्यांनी आता प्रयोगशाळेतून बाहेर पडायला हवे.
"मिथ्या'ची कथा-पटकथा सौरभ शुक्‍ला आणि रजत कपूर या दोघांनी लिहिली आहे. मुंबईतल्या ग्लॅमर जगतात आपलं नशीब आजमावून पाहण्यासाठी इथं दररोज अनेक जण येत असतात. व्हीके (रजत कपूर) हा त्यापैकीच एक. चांगला अभिनेता बनण्याचं स्वप्न त्यानं पाहिलेलं असतं. हे स्वप्न साकारण्यासाठी वाट्टेल ते करायची त्याची तयारी असते. दुर्दैवानं काही गुन्हेगाराच्या मदतीनं (नसिरुद्दीन शाह, विनय पाठक) त्याच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास सुरू होतो; मात्र या प्रवासात त्याचा गुन्हेगारी क्षेत्रातलं एक प्यादं म्हणून उपयोग केला जातो. या व्हीकेकडे गुन्हेगारी क्षेत्रातल्या मंडळींचं लक्ष जाण्याचं कारण म्हणजे त्याचा चेहरा. तो हुबेहूब अंडरवर्ल्डमधल्या डॉनसारखा दिसत असतो. या डॉनची विरोधक मंडळी नेमकी या गोष्टीचा फायदा घेतात. त्याचा काटा काढून ते व्हीकेला डॉन करतात. हा भाग अमिताभ बच्चनच्या "डॉन' चित्रपटाशी बराचसा मिळताजुळता आहे; पण एका अपघातात व्हीकेची स्मृती हरवते आणि त्याचं आयुष्य आणखीनच अवघड बनते. खोटा डॉन बनून तो खऱ्या डॉनच्या घरी जातो. पुढे त्याच्या मुलांचा त्याला लळा लागतो. अर्थातच खऱ्या डॉनच्या सहायकांना कालांतरानं व्हीकेचं खरं रूप कळतं. आपला जीव गमावून त्याला अभिनय करण्याची किंमत मोजावी लागते.
चित्रपटाचं कथानक फार काही नवीन नाही. त्याचा शेवट मात्र खूपच अनपेक्षित आहे. क्षणभर त्यावर विश्‍वास बसत नाही. अशा प्रकारचे विषय हाताळणं, हे खूप धाडसाचं काम आहे. "भेजा फ्राय'च्या यशानं दिग्दर्शक रजत कपूर यांनी हा प्रयोग केला असावा. हा प्रयोग काही प्रसंगांमध्ये जमलाय, तर काहींमध्ये फसलायसुद्धा. व्हीकेचं अभिनयाचं वेड आणि त्याचं गुन्हेगारी क्षेत्रात फसत जाण्याचा भाग छान जमलाय. व्हीकेच्या व्यक्तिरेखेतला निरागसपणा दिग्दर्शकानं चांगला दाखवलाय; परंतु तो कधी कधी "ओव्हर' झालाय. खोटा "डॉन' बनल्यानंतर व्हीकेनं काही गुन्हेगारांची घेतलेली फिरकी धमाल उडवते. या सिनेमाची गाडी घसरलीय ती रणवीर शौरी आणि नेहा धुपिया यांच्या प्रेमाच्या ट्रॅकनं. मूळ कथानकाशी फारशी जवळीक नसूनही दिग्दर्शकानं तो विनाकारण ताणलाय. रणवीर शौरी या चित्रपटात खूपच उठून दिसलाय. विनोदी प्रसंगांबरोबरच गंभीर दृश्‍यांमध्येही तो चांगला वाटतो. त्याच्या वाट्याला आणखी दमदार व्यक्तिरेखा यायला हव्यात. नेमकी हीच गोष्ट नेहा धुपियालासुद्धा लागू होते. अगदी छोट्या व्यक्तिरेखेतही ती लक्षात राहते. गॅंगस्टर गावडेची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या नसिरुद्दीन शाह यांचा अभिनय नेहमीप्रमाणेच "परफेक्‍ट' कॅटेगरीतला आहे. विनय पाठक या वेळी "रोल'च्या दृष्टीनं "बॅकसीट'ला आहे. हर्ष छाया या कलाकाराचाही अभिनय अगदी सहज वाटतो. वेगळ्या "थीम्स'च्या शोधात असलेल्या प्रेक्षकांना हा चित्रपट आनंद देईल. बाकीच्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तरी फारसा फरक पडणार नाही.

Tuesday, February 19, 2008

भव्य पोशाखीपट


भव्य पोशाखीपट



ऐतिहासिक पटाच्या निर्मितीसाठी कोणत्याही दिग्दर्शकाकडे अत्यावश्‍यक असणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे "पेशन्स' आणि "पॅशन.' दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्याकडे या दोन्ही गोष्टी अंगभूत आहेत. म्हणूनच "जोधा अकबर'बद्दलच्या अपेक्षा अगदी आकाशाला जाऊन भिडतात.
अकबराचं चरित्र सर्वांनाच ठाऊक आहे; पण या चरित्रातलं एक निसटलेलं आणि दुर्लक्षिलेलं पान म्हणजे शहेनशहा आणि महाराणी जोधाबाई यांची प्रेमकहाणी. तीन तास 20 मिनिटं लांबीचा हा पोशाखी पट प्रेक्षकाला चार शतकं मागं घेऊन जाण्यात नक्कीच यशस्वी ठरलाय. दिग्दर्शकाची माध्यमावरची पकड, किरण देवहन्स यांचं अप्रतिम कॅमेरावर्क, नितीन देसाई यांनी उभं केलेलं मोघल व राजपूत साम्राज्य, ए. आर. रहमानचं पार्श्‍वसंगीत, हृतिक रोशनचं राजबिंडं रूप व ऐश्‍वर्य रायचं मूर्तिमंत सौंदर्य... आदी जमेच्या बाजूंनी हा चित्रपट अगदी ठासून भरलाय. परंतु, तरीही हा चित्रपट संपल्यानंतर काहीतरी राहून गेल्याची खंत आपला पिच्छा सोडत नाही. एक तर हा चित्रपट खूपच लांबलाय. दोन तासांचा पूर्वार्ध पाहणाऱ्याची कडी परीक्षा घेतो. जोधा-अकबरची "आऊट ऍण्ड आऊट' प्रेमकहाणी... या अपेक्षांवरही हा चित्रपट काही प्रमाणात निराशा करतो. या दोघांच्या प्रेमापेक्षा चित्रपटाचा फोकस तरुण अकबराच्या योगदानावरच अधिक केंद्रित झालाय. या काही त्रुटी वगळल्यास एकदा तरी आवर्जून पाहावा असा हा ऐतिहासिक पट आहे.
"लगान'प्रमाणेच हा चित्रपटदेखील अमिताभ बच्चन यांच्या "नॅरेशन'नं सुरू होतो. काही मिनिटांमध्ये त्यांचा भारदस्त आवाज प्रेक्षकाला सोळाव्या शतकामधील मोघल-राजपूत राजकारणात घेऊन जातो. "मोघल-ए-आझम' आणि "रझिया सुलतान' या चित्रपटांच्या संवादांवर उर्दू भाषेचा खूप प्रभाव होता. गोवारीकर यांनी ही गोष्ट आपल्या फिल्ममध्ये प्रकर्षानं टाळलीय. के. पी. सक्‍सेना यांचे संवाद समजायला सोपे आहेत. अकबराचं खरं नाव जलालुद्दीन महम्मद. मानलेली आई आणि वरिष्ठांच्या आज्ञेखाली वाढलेल्या जलालुद्दीनचा सुरुवातीचा काळ दिग्दर्शकानं खूप छान टिपलाय. अकबर आणि जोधामध्ये विवाहाच्या निमित्तानं एक राजकीय करारनामा झाला होता. हा भागसुद्धा चित्रपटात अत्यंत परिणामकारकरीत्या उतरलाय. पूर्वार्धातला सर्वात लक्षात राहणारा प्रसंग म्हणजे अकबरानं माजलेल्या हत्तीशी केलेली झुंज. त्यानंतर जोधाबरोबर अकबराचा झालेला विवाह आणि मनं जुळेपर्यंत शरीरानं एकत्र न येण्याचा जोधाबाईचा निर्णय हे प्रसंगसुद्धा लक्षात राहतात. गोवारीकर यांच्यातला कुशल तंत्रज्ञ आपल्यातल्या "स्टोरी टेलर'वर अधिक कुरघोडी करून गेलाय. त्यामुळेच बऱ्याच दृश्‍यांमधली देखणी चित्रचौकट भावूनही कथानक फार पुढे सरकत नाही. पूर्वार्धातली सर्वात मोठी त्रुटी म्हणजे कथानकाचा संथ वेग आणि लांबी. काही प्रसंग चमकदार आहेत; पण त्यांच्यात सातत्य नसल्यामुळे पाहणाऱ्याचं लक्ष "इंटरव्हल'च्या पाटीची प्रतीक्षा करू लागतं. त्याउलट उत्तरार्धाचं झालंय. एक तास 20 मिनिटांचा उत्तरार्ध कधी संपलाय ते कळतच नाही. या दोन्हीचा "बॅलन्स' साधला गेला असता, तर हा चित्रपट अधिक परिणामकारक ठरला असता. उत्तरार्धही जोधा-अकबरच्या प्रेमापेक्षा सत्तेच्या रक्तरंजित राजकारणावर अधिक भाष्य करणारा आहे. जोधाबाई आणि अकबरामधल्या प्रेमकहाणीवर इतिहासात फार कमी लिहिलं ग
ेलंय. त्यामुळेच कदाचित हा भाग म्हणावा तितका प्रभावशाली ठरलेला नाही. निव्वळ प्रेमकहाणीच्या दृष्टीनं या फिल्मचा पूर्वार्ध अगदी चार पावलं पुढे गेलाय. अकबरानं आपल्या न केलेल्या चुकीसाठी माहेरी पाठविल्यानं जोधा त्याच्यावर नाराज असते. या दोघांमधल्या तलवारबाजीचा प्रसंग रोमांचक आहे; पण या एकमेव कारणामुळे जोधाचं हृदयपरिवर्तन संभवत नाही. आपल्या बहिणीच्या पतीबरोबर अकबराची झालेल्या लढाईची दृश्‍यंही थोडी लांबल्यासारखी वाटतात.
हा ऐतिहासिक पट जमून आलाय ते कलाकारांच्या झक्क कामगिरीमुळे. हृतिक रोशननं अकबराची साकारलेली व्यक्तिरेखा त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतली सर्वोत्तम ठरली आहे. आपल्या राजबिंड्या रूपाला त्यानं अभिनयाची अतिशय उत्तम जोड देत एक कठीण व्यक्तिरेखा अत्यंत सहजतेनं साकारलीय. ऐश्‍वर्या रायचं सौंदर्य चित्रपटगृहाचा पडदा व्यापून टाकणारं आहे. सोनू सूद, नितकीन धीर या दोन तरुण कलाकारांचा अभिनय लक्षात राहण्याजोगा आहे. अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम सिन्हा यांनी या चित्रपटात अकबराच्या आईची व्यक्तिरेखा साकारलीय; पण त्यांना मर्यादित वाव आहे. ए. आर. रहमान हे त्यांच्या संगीताऐवजी त्यांच्या पार्श्‍वसंगीतासाठी अधिक कौतुकास पात्र आहेत. "अझीम ओ शान शहेनशहा', "ख्वाजा मेरे ख्वाजा' ही गाणी सुरेल चालींबरोबरच त्याच्या नृत्यांसाठी लक्षात राहतात. ऐतिहासिक पट आपल्याकडे क्वचितच बनतात. म्हणूनच काही खटकणाऱ्या गोष्टी असूनही गोवारीकरांच्या या पोशाखी पटाला भेट द्यायलाच हवी.

Wednesday, February 13, 2008

पॅशनेट कॅमेरामन ः संजय जाधव


पॅशनेट कॅमेरामन ः संजय जाधव
------------
चित्रपटसृष्टीतल्या प्रत्येक तंत्रज्ञाचं आयुष्यात कधी ना कधी दिग्दर्शक बनण्याचं स्वप्न असतं. प्रसिद्ध कॅमेरामन संजय जाधव यांनीही हे स्वप्न पाहिलं होतं. "चेकमेट'च्या रूपानं ते पूर्ण होतंय. "सावरखेड एक गाव', "डोंबिवली फास्ट', "पक पक पकाक', "आईशप्पथ' आदी चित्रपटांचे छायादिग्दर्शक जाधव आता मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही ऍक्‍टिव्ह होत आहेत.--

ः तंत्रज्ञानं दिग्दर्शक बनायलाच हवं, या स्वप्नपूर्तीसाठी दिग्दर्शक झालात की खरोखरच चांगला विषय मिळाल्यामुळं "चेकमेट' स्वीकारलात ?
ः या दोन्ही कारणांमुळे मी दिग्दर्शक बनलो. कॅमेरामन म्हणून बऱ्यापैकी नाव कमावलं असलं, तरी मला स्वतःची फिल्म करायची होती. त्या दृष्टीनं मी सतत विचार करायचो; मात्र माझा स्वतःचा चित्रपट येईल, तो "स्टायलाईज्ड' असलाच पाहिजे, अशी पक्की खूणगाठ मी माझ्या मनाशी बांधली होती. आपल्या चित्रपटाची तुलना झालीच, तर ती आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्रपटांशी व्हावी, अशीदेखील माझी महत्त्वाकांक्षा होती. साच्यातला मराठी चित्रपट करण्याऐवजी "रूल ब्रेक' करणारा चित्रपट मला करायचा होता. त्या दृष्टीनं मी कथानक शोधायला सुरुवात केली.

ः या चित्रपटाची पटकथा तुझी आहे. दिग्दर्शनाबरोबरच लेखनाची अवघड जबाबदारी तू एकाच वेळी का स्वीकारलीस?
ः आपल्याकडच्या फिल्ममधला ठराविक पॅटर्न म्हणजे एक हिरो, एक हिरोईन आणि एक व्हिलन. मला खरोखरच वेगळा सिनेमा करायचा होता, त्यामुळे मी प्रथम माझी "थॉट प्रोसेस' नक्की केली. मला माझ्या चित्रपटातला हीरो हा रामासारखा आदर्श नको होता किंवा रावणासारखा विकृतही नको होता. या दोन्हीच्या मधल्या अवस्थेत असलेल्या हीरोच्या मी शोधात होतो. दोन तास एकाच हीरोला बघण्याऐवजी आपण प्रेक्षकांना एकाऐवजी चार हीरो, हिरोईन्स दाखवले तर? अशा प्रकारचं कथानक माझ्या डोक्‍यात घोळत होतं. हा प्रकार मी स्वतः "व्हिज्युअलाईज' करीत असल्यामुळे पटकथा मीच लिहिण्याचा निर्णय घेतला; मात्र संवादलेखनाची जबाबदारी मी विवेक आपटेंवर सोपवली. आम्हा दोघांना एकमेकांची भाषा खूप छान समजते.

ः मराठीतले सध्याचे सर्व आघाडीचे कलाकार या चित्रपटात आहेत. त्यांची निवड कशी केलीत?
ः या बाबतीत मी खूप सुदैवी आहे. वाईला एकदा चित्रीकरणातून थोडी उसंत मिळाल्यानंतर मी पटकथा लिहायला घेतली. या वेळी मी ज्या कलाकारांकडे पाहून त्या व्यक्तिरेखा लिहीत होतो, ते सर्व कलाकार मला माझ्या चित्रपटासाठी मिळाले. एखाद्या लेखक-दिग्दर्शकाचं सुदैव यापेक्षा आणखी दुसरं काही नसावं.ः "चेकमेट'च्या "मेकिंग'चा कसा अनुभव होता?ः खूपच छान. लिहिताना जे जे मी पाहिलं होतं, प्रत्यक्षात ते मी "शूट' करू शकलो. शूटिंगला सुरुवात करण्यापूर्वी आम्ही एक नियम केला होता. दररोजचं शूटिंग संपलं, की मी स्पॉटबॉयपासून ते आघाडीच्या कलाकारांपर्यंत सगळ्यांना एकत्र घेऊन बसत असे. उद्या काय घडणार आहे, याचा सर्व तपशील मी त्यांच्याकडे स्पष्ट करी. त्यामुळे उद्या काय घडणारेय याची आधीच कल्पना आल्याने प्रत्येक जण सेटवर पूर्ण तयारीनिशी येई. हर्षदा खानविलकरनं या चित्रपटात "प्रॉडक्‍शन डिझायनर' म्हणून खूप मोलाचं काम केलंय. मुंबईतले अनेक "स्पॉटस्‌' प्रेक्षकांना या फिल्ममध्ये पाहायला मिळतील. शूटिंगची परवानगी मिळविण्यासाठी हर्षदाला काही ठिकाणी अख्खा दिवस बसावं लागलंय.

ः "डोंबिवली फास्ट'च्या शूटिंगचा काही उपयोग झाला का?
ः खूपच झाला. "डोंबिवली फास्ट'च्या शूटिंगवेळी दिग्दर्शक निशीकांत कामतनं मला खूपच मोकळीक दिली होती. या चित्रपटाच्या शूटिंगवेळी मी खऱ्या अर्थानं "कमांड'मध्ये होतो. शूटिंगसाठी मी जे जे मागितलं, ते ते सर्व निशीनं मला उपलब्ध करून दिलं. "रियल लोकेशन'वर शूटिंग करण्याचा या चित्रपटाचा अनुभव मला खूप उपयोगी पडला.

ः अवघे 15 चित्रपट तुझ्या गाठीशी असूनही चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर तुझ्या प्रेमात आहेत. त्याबद्दल थोडं सांगशील?
ः मी स्वतःला खूप नशीबवान समजतो. खूप कमी काम करूनही माझ्याबद्दल दिग्गजांनी खूप छान प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. "डोंबिवली फास्ट'चा तमीळ रीमेक पाहून मणी सर (मणी रत्नम) अक्षरशः भारावले होते. "या फिल्मचा कॅमेरामन कुठंय? त्याला मला भेटायचंय!' अशी त्यांची प्रतिक्रिया होती. दक्षिणेतले विख्यात कॅमेरामन पी. सी. श्रीराम यांनाही माझं काम आवडलंय. मिथुन चक्रवर्ती, परेश रावल, नाना पाटेकर यांनीही माझं कौतुक केलंय. रावल आणि पाटेकर यांनी कौतुकाबरोबरच मला नवीन चित्रपटही मिळवून दिलेत. पाटेकरांमुळे मला "यूटीव्ही'चा एक चित्रपट मिळालाय. या सर्वांचं ऋण मी विसरू शकत नाही.

ः सध्या कोणते नवीन चित्रपट करतोयस?
ः "यूटीव्ही'चा "बॉम्बे मेरी जान' (दिग्दर्शक ः निशिकांत कामत) सध्या मी करतोय. त्याबरोबरच "बालाजी मोशन पिक्‍चर्स'चाही एक चित्रपट माझ्याकडे आहे. परेश रावल यांचा "लीड रोल' असलेल्या चित्रपटाचं छायांकन करण्याची मला संधी मिळालीय.

ः "फुल टाइम डिरेक्‍टर' बनण्याचा विचार आहे का?
ः निश्‍चितच नाही. कारण, "सिनेमॅटोग्राफी' ही माझी "पॅशन' आहे. तिच्याशिवाय मी जगूच शकत नाही. एक वेळ मला चित्रपटाचं दिग्दर्शन करायला मिळालं नाही तरी चालेल, पण छाया दिग्दर्शन अगदी "मस्ट' आहे.

ः तुझे आवडते "सिनेमॅटोग्राफर' कोण?ः संतोष सिवन आणि बिनोद प्रधानांचा मी प्रचंड चाहता आहे. "रोजा', "गर्दिश', "1942 अ लव्ह स्टोरी', "परिंदा' हे चित्रपट मला खूप प्रिय आहेत.

Tuesday, February 12, 2008

परीक्षण - चेकमेट


परीक्षण - चेकमेट

जंजाळ

बुद्धिबळाचे अनेक डाव एखाद्या हॉलमध्ये एकाच वेळी मांडलेत आणि त्याचा मनमुराद आनंद लुटा, असं कोणा संयोजकानं सांगितलं तर? नेमका हाच प्रश्‍न संजय जाधव यांचा "चेकमेट' चित्रपट पाहताना पडतो. रहस्य आणि थराराचं खूप छान मिश्रण पाहण्याची ताकद या चित्रपटात होती; परंतु दिग्दर्शकानं रहस्याचे अनेक "प्लॉट्‌स' एकाच वेळी सुरू ठेवत पाहणाऱ्याला उगीचच दोन-अडीच तास भिरभिरत ठेवलंय. हॉलीवूड स्टाईलची हाताळणी आणि कलाकारांचे अभिनय या दोन भक्कम बाजूंनी हा चित्रपट वेगवान झालाय. पण सरळ फ्रेम्समधूनही सांगता येणारा आशय दिग्दर्शकानं सतत वाकड्यातिकड्या कॅमेरा अँगल्सनं टिपलाय. फ्लॅशबॅक या तंत्राचाही अतिरेक झाल्यानं कथानकातली गुंतागुंत वाढून सगळा जंजाळ झालाय. दिग्दर्शकानं खूपच "ऑफ बीट' वाटेवर न चालता "स्टोरी टेलिंग'चा सोपा मार्ग निवडला असता तर हा चित्रपट आणखी रंगतदार अनुभव ठरला असता.
"चेकमेट'ची कथा-पटकथा स्वतः दिग्दर्शकानंच लिहिलीय. अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, राहुल मेहेंदळे या तीन तरुणांची ही कथा आहे. तीस दिवसांत पैसे दुप्पट... अशा प्रकारचं गाजर दाखविणाऱ्या एका स्कीममध्ये हे तिघंही तरुण कोटीच्या घरातली रक्कम गुंतवतात. अर्थातच हे पैसे बुडतात. तेव्हा बुडालेले पैसे पुन्हा परत मिळवण्यासाठी त्यांची एकच पळापळ सुरू होते. या पळापळीत त्यातला एक जण आपल्या मैत्रिणीला सहभागी करून घेतो. एक गुन्हा केला तरी शिक्षा आणि दहा गुन्हे केले तरी शिक्षा. या न्यायानं मग त्यांना पैसे कमावण्यासाठी कोणताच मार्ग वर्ज्य उरत नाही. प्रत्येक जण एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यांच्या या खेळात दोन पोलिस अधिकारी (रवी काळे-उदय सबनीस), एक राजकीय नेता आणि त्याचा मुलगा (विनय आपटे-संजय नार्वेकर) आदी मंडळी सहभागी होतात. शह-काटशहामुळे हा खेळ उत्तरोत्तर रंगत जातो.
कॅमेऱ्यातलं आपलं नैपुण्य सिद्ध केल्यानंतर जाधव यांनी दिग्दर्शन क्षेत्राकडे वळणं साहजिक आहे. या मार्गावरून यापूर्वी अनेकांनी वाटचाल केलीय आणि प्रत्येकाकडून एक ढोबळ चूक झालीय. ही सर्व मंडळी दिग्दर्शनाच्या पहिल्या प्रयत्नात आपल्यात दडलेल्या दिग्दर्शकाऐवजी कॅमेरास्कीलच अधिक दाखवीत असतात. "चेकमेट'मध्येही नेमकं असंच घडलंय. चित्रपटाची सुरुवात त्यांनी चांगली केलीय. तीन मित्रांची झालेली आर्थिक फसवणूक आणि त्यानंतरच्या जाळ्यात त्यांची झालेली फसगत दिग्दर्शकानं चांगली दाखवलीय. पण फ्लॅशबॅक तंत्राचा अवाजवी वापर आणि सतत भिरभिरणाऱ्या कॅमेऱ्यामुळे पाहणाऱ्याला दिग्दर्शकानं कथानकात स्थिरावूच दिलेलं नाही. रहस्याची गुंतागुंत एवढी वाढलीय की शेवटी शेवटी त्यातला पाहणाऱ्याचा "इंटरेस्ट' कमी होतो. चित्रपटाचा शेवटसुद्धा अपेक्षित वळणावर झालाय.
हा चित्रपट तोलून धरलाय तो त्यातल्या कलाकारांनी. अंकुश चौधरी, राहुल मेहेंदळे, विनय आपटे, रवी काळे, उदय सबनीस, आनंद अभ्यंकर... आदी कलावंतांची कामं छान आहेत. मात्र, सर्वात लक्षात राहतो तो स्वप्नील जोशी. चित्रपट माध्यमानं आता आपल्याला अधिक "सिरीयसली' घ्यायला हवं, असा परफॉर्मन्स त्यानं या चित्रपटातून दिलाय. संजय नार्वेकरने काही ठिकाणी हशा मिळवलाय खरा; पण त्याची व्यक्तिरेखा आणखी छान रेखाटता आली असती. एकंदरीत मराठी भाषेतून हॉलीवूडचा फील घ्यायचा असेल तर हा चित्रपट पाहायला हवा.
- मंदार जोशी

मेकिंग ऑफ जोधा अकबर


मेकिंग ऑफ जोधा अकबर
-------------
"लगान', "स्वदेस' आणि आता "जोधा अकबर'. प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी पडद्यावर हाताळलेली पहिलीच "आऊट अँड आऊट' प्रेमकहाणी म्हणजे "जोधा अकबर'. प्रेमासारखा हळूवार विषय असूनही या दिग्दर्शकानं त्याला भव्यदिव्य पातळीवर सादर करण्याचं स्वप्न पाहिलंय. या चित्रपटाचा विषय सुचण्यापासून ते आपलं स्वप्न पडद्यावर साकार होईपर्यंतच्या खडतर प्रवासाबद्दलची त्यांची ही निरीक्षणं.
------------------
""पुढचा चित्रपट आपण ऍक्‍शन चित्रपट बनवूया किंवा आपली पुढची फिल्म रोमॅंटिक असेल, असं पक्कं ठरवून मी कधीही चित्रपट करीत नाही. "पिरीयड फिल्म बनवून झाली, आता आपण एखादा "हिस्टॉरिक' बनवूया !' असा विचार माझ्या मनाला कधी शिवत नाही. एखादं कथानक सुचलं की काही महिने मी त्याच्यातच राहतो. त्यानंतरही माझा त्या कथेतला "इंट्रेस्ट' कायम राहिला तरच मी त्यावर चित्रपट करण्याचा निर्णय घेतो. यापुढच्या काही महिन्यांमध्ये माझ्या मनात एखादं "हॉरर' कथानक घोळत राहिलं तर कदाचित माझा पुढचा चित्रपट "हॉरर'सुद्धा असेल.'' आशुतोष गोवारीकर मुलाखतीच्या सुरुवातीलाच चित्रपटाचं कथानक निवडण्यामागची आपली मतं अगदी स्पष्टपणे ऐकवतात. "जोधा अकबर' ही त्यांनी पडद्यावर साकारलेली पहिलीच प्रेमकथा. ती निवडण्यामागचं त्यांचं "लॉजिक'ही थोडंसं वेगळं होतं. त्याबद्दल ते म्हणतात, "" "जोधा अकबर'ची कथा हैदर अली यांची आहे. "लगान'च्या प्रदर्शनानंतर एक वर्षानं त्यांनी ती मला ऐकवली होती. पण, त्यावेळी मी ही प्रेमकहाणी हाताळण्यास पूर्ण तयार नव्हतो. "जोधा अकबर' करण्यासाठी मला त्याच्याआधी आणखी एक चित्रपट करणं आवश्‍यक वाटलं. म्हणूनच मी "लगान'नंतर लगेच "जोधा अकबर' न करता "स्वदेस' बनवला. "लगान' आणि "स्वदेस'मध्येही थोडाफार "रोमान्स' होता. पण, या चित्रपटांना "रोमॅंटिक' चित्रपट म्हणता येणार नाही. "जोधा अकबर'ची प्रेमकहाणी मला आवडण्याचं कारण म्हणजे त्यातला साधेपणा. "अरेंज्ड मॅरेज' ही आपली संस्कृती. लग्न झाल्यानंतरच आपल्याकडे पती-पत्नीमध्ये प्रेमकहाणी सुरू होते. एकमेकांबद्दल आदर निर्माण होतो आणि "बॉंडिंग' घडतं. अकबर आणि जोधाबाई यांच्यात विवाहापूर्वी एक राजकीय करारनामा झाला होता. लग्नानंतर त्यांच्या नात्यात काय घडलं, याची इतिहासात नोंद नाही. ही जी "गॅप' आहे, ती भरून काढण्याचा प्रयत्न आम्ही या फिल्मद्वारे केलाय.''
ऐतिहासिक चित्रपट म्हटलं की, वादविवाद आलेच. संबंधित चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होण्यापासून ते प्रदर्शनाच्या दिवसापर्यंत हे वाद सुरूच असतात. "जोधा अकबर' हा चित्रपटसुद्धा त्याला अपवाद ठरलेला नाही. काहींनी अकबर आणि जोधा यांच्यातल्या नात्यालाच आक्षेप घेतलाय. अशा परिस्थितीत संशोधन हा मुद्दा खूप महत्त्वाचा ठरतो. अशाप्रकारचे वाद भविष्यात उद्‌भवतील, याची गोवारीकर यांना बहुधा कल्पना असावी. म्हणूनच त्यांनी संशोधनात कसलीच उणीव ठेवलेली नाही. याबद्दल ते सांगतात, ""ऐतिहासिक किंवा "पिरीयड फिल्म' करताना संधोधन करणं हे फक्त महत्त्वाचं नसून "कम्पलसरी' ठरतं. "स्वदेस'च्या वेळीही मी गावोगाव फिरून संशोधन केलं होतं. "जोधा-अकबर'च्या संशोधनासाठी प्रत्यक्ष फिरण्याऐवजी वाचनाची अधिक गरज होती. या चित्रपटात अकबराच्या 13 ते 28 वयापर्यंतचा कालावधी चित्रीत करण्यात आला आहे. मी, त्या काळातल्या घटनांचा अधिक अभ्यास केला. सर्वप्रथम अकबरावरची सर्व पुस्तकं वाचली. मोघलांचा, राजपुतांचा इतिहास नजरेखाली घातला. अलीगड मुस्लिम विद्यापीठाला भेट दिली. मुंबई तसेच जयपूर विद्यापीठातील इतिहासतज्ज्ञांबरोबर चर्चा केली. अकबराच्या दरबारात अबुल फझल आणि बदायुनी असे दोन "कोर्टियर' होते. यापैकी फझलनं "अकबरनामा' हा ग्रंथ लिहिला तर बदायुनीनं "मुन्तखुबउल्तवारीख' या ग्रंथाची निर्मिती केली. अकबराच्या दरबारात राहून दोघांनी हे ग्रंथ लिहिले. गंमत म्हणजे हे दोघेही परस्परांचे कट्टर दुश्‍मन. दोघांनीही आपापल्या नजरेतून अकबराचं चरित्र लिहिलं. त्यांचे वेगवेगळे "व्ह्यू पॉईंटस्‌' मी विचारात घेतले आणि जोधा-अकबर यांच्या विवाहानंतर काय घडलं असेल, याची माझ्या नजरेतून कल्पना केली. अर्थात, मी जे काही स्वातंत्र्य घेतलंय, त्याचं प्रमाण खूप मर्यादित आहे. ते पडद्यावर पाहताना प्रेक्षकांना त्या काळात असंच
काहीतरी घडलं असावं, यावर विश्‍वास बसेल.''
ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीमधली सर्वात कठीण गोष्ट म्हणजे त्याचं "मेकिंग'. अर्थात गोवारीकर यांना "लगान'च्या कठीण "मेकिंग'चा अनुभव गाठीशी असल्यानं "जोधा अकबर'च्या चित्रीकरणावेळी फारशी अडचणी आल्या नाहीत. याबद्दल ते सांगतात, ""या चित्रपटाची कार्यकारी निर्माती आहे माझी पत्नी सुनीता गोवारीकर. तिला सिनेमा हे माध्यम खूप छान उमगलंय. तसेच तिची प्रशासनावरही चांगली पकड आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निर्मितीच्या आघाडीवर मी खूप कमी लक्ष दिलं. या चित्रपटाचं "आऊटडोअर' तब्बल सहा महिन्यांचं होतं. "लगान'पेक्षा दोन महिन्यांनी अधिक. हा ऐतिहासिक चित्रपट असल्यानं आम्हांला युद्धसामग्री, कपडे तसेच प्राण्यांबद्दलचं वेगळं "डिपार्टमेंट' सुरू करावं लागलं. या चित्रपटात एकूण 100 हत्ती, 50 उंट आणि शंभर घोडे पाहायला मिळतील. कलाकारांचं "कास्टिंग' केल्याचं आपणास ठाऊक आहे. पण, या चित्रपटासाठी मी प्राण्यांचंही "कास्टिंग' केलं. कारण, शूटिंग सुरू झाल्यानंतर ऐन वेळी एखाद्या प्राण्याचं बिथरणं आम्हाला परवडणारं नव्हतं. म्हणूनच कोणता हत्ती मदमत्त आहे, याची आम्ही आधीच खातरजमा केली. त्यासाठी "अपोलो सर्कस'चे प्रतापसिंग यांची आम्ही मदत घेतली. चित्रीकरणासाठी आपण कोणत्याही प्राण्याचा उपयोग करू शकतो. मात्र, त्यासाठी "ऍनिमल वेल्फेअर बोर्डा'च्या किचकट नियमांची तुम्हांला पूर्तता करावी लागते. या संस्थेच्या सर्व नियमांचे आम्ही पालन केले. शूटिंग सुरू असताना दर दोन तासांनी आम्ही प्राण्यांना विश्रांती दिली. त्यांची देखभाल करण्यासाठी डॉक्‍टर्सही सेटवर उपस्थित होते. या प्रक्रियेमुळे शूटिंगचे दिवस वाढले. हत्तींचं शूटिंग असताना कधी कधी आम्ही दिवसाला फक्त एका शॉटच्या पुढं नाही जाऊ शकलो. त्यामुळे चित्रपट पूर्ण व्हायला 200 दिवस लागले.''
"जोधा-अकबर'चं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे त्याचे "लीड' कलाकार. या चित्रपटांचे ट्रेलर पहिल्यांदा चित्रपटगृहांमध्ये झळकले तेव्हा हृतिक आणि ऐश्‍वर्याचा "लूक' पाहून प्रेक्षकांना मोठा धक्का बसला होता. या दोघांच्या "कास्टिंग'बद्दल गोवारीकर सांगतात, ""या चित्रपटाची पटकथा लिहीत असतानाच मी जोधा आणि अकबरच्या रूपात ऐश्‍वर्या आणि हृतिकला पहात होतो. ते आपल्या चित्रपटासाठी मिळतील की नाही, याची मला कल्पना नव्हती. पण, माझ्या सुदैवानं सर्व काही जुळून आलं. हृतिकचा राजबिंडेपणा आणि ऐश्‍वर्याचं सौंदर्य अकबर आणि जोधाच्या व्यक्तिरेखांना "सूट' ठरलं. विशेष म्हणजे "क्रिश' आणि "धूम-2' हे दोन चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी मी हृतिक आणि ऐश्‍वर्याला या चित्रपटासाठी "साईन' केलं होतं. स्टारची प्रतिमा त्याच्या नव्या चित्रपटाला त्रास देते, असं मला वाटत नाही. कारण, चित्रपटगृहातले दिवे मालवले की प्रेक्षक त्यात हरवला गेला पाहिजे. तसं झालं तर ते कलाकार आणि दिग्दर्शकाचं यश असतं.''
"यूटीव्ही'चे रॉनी स्क्रूवाला आणि "आशुतोष गोवारीकर प्रॉडक्‍शन लिमिटेड' यांनी संयुक्तरित्या या चित्रपटाची निर्मिती केलीय. या चित्रपटाचं "स्केल' खूप मोठं असल्यानं सुरुवातीला त्याला अर्थपुरवठादार मिळण्यास अडचणी आल्याचं गोवारीकर सांगतात. मात्र, ऐतिहासिक चित्रपटांबरोबर आजच्या घडीचे चित्रपटही आपणास तेवढेच "रिस्की' वाटत असल्याचाही मुद्दा ते उपस्थित करतात. "चित्रपटाचा जॉनर हा "रिस्की' नसतो. तुम्ही कथानक कसं प्रेझेंट करता हे अधिक महत्त्वाचं,' असं सांगायलाही ते विसरत नाही. "लगान'प्रमाणेच "जोधा अकबर'च्या "मेकिंग'दरम्यान गोवारीकर यांचा पाठदुखीचा आजार बळावला. त्यामुळे दोनदा या चित्रपटाचं प्रदर्शन त्यांना पुढं ढकलावं लागलं. डॉक्‍टरांनी "कम्प्लिट बेडरेस्ट'चा सल्ला दिल्यानं या दिग्दर्शकाला संकलनाचं काम वेळेत पूर्ण होण्यासाठी आपल्या "एडिटिंग रूम'मध्येच बिछाना तयार करावा लागला. गोवारीकर यांची ही पाच वर्षांची मेहनत आता पडद्यावर येतेय. तेव्हा त्यांच्या या पहिल्यावहिल्या प्रेमकहाणीचं प्रेक्षक कसं स्वागत करतात ते पाहायचं.
- मंदार जोशी

Thursday, February 7, 2008

इरसाल!



मराठी चित्रपट बदलतोय, असं आपण गेली दोन-तीन वर्षं सतत म्हणतोय, पण या बदलाच्या पलीकडं जाऊन काहीतरी छान आणि वेगळं पाहिल्याचं एकत्रित समाधान उमेश कुलकर्णी दिग्दर्शित "वळू' हा चित्रपट देतो. ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांच्या ग्रामीण ढंगाच्या कथेतला विनोद आजही आपल्या मनात घर करून बसलाय. कुलकर्णींच्या चित्रपटरूपी विनोदाची जातकुळी मिरासदारांच्या साहित्यकृतींशी जवळीक साधणारी आहे.

देवाच्या नावानं गावात सोडण्यात आलेल्या एका वळूनं घातलेला धिंगाणा आणि त्याला पकडण्यासाठी गावकऱ्यांनी लावलेली "फिल्डिंग' हा या चित्रपटाचा अगदी सरळ आणि साधा विषय. त्याला ग्रामीण वातावरणनिर्मिती, तांत्रिक हुशारी आणि सर्व कलावंतांच्या उत्तम अभिनयाची जोड मिळाल्यानं हा चित्रपट अगदी झक्क जमून गेलाय. पटकथेत काही जरूर त्रुटी आहेत, पण त्यांच्याकडे साफ डोळेझाक करून पाहावा, असा हा चित्रपट आहे.

कुसावडे गावात बऱ्याच महिन्यांपासून एका बैलाचा धिंगाणा सुरू असतो. त्यामुळे गावकऱ्यांनी त्याची मोठी धास्ती घेतलेली असते. या बैलाला आवर घालण्यासाठी शहरातून स्वानंद गड्डमवार (अतुल कुलकर्णी) या फॉरेस्ट ऑफिसरला बोलाविण्यात येतं. खरं तर हा वाघ, बिबट्यांना आवर घालणारा अधिकारी. त्यामुळेच वळू पकडण्यासारखं किरकोळ काम काय करायचं, असा त्याचा आविर्भाव असतो, पण गावात आल्यानंतर सरपंच (मोहन आगाशे), जीवन्या (गिरीश कुलकर्णी), भटजी (दिलीप प्रभावळकर) अशा काही इरसाल व्यक्तिमत्त्वांशी त्याची गाठ पडते. माजलेला वळू पकडणं, या कथानकावर अडीच तासांचा सिनेमा करणं ही खरोखरच खूप कठीण गोष्ट आहे. ती सोपी करण्यासाठी लेखक-दिग्दर्शकानं वळू पकडण्याच्या प्रक्रियेवर "डॉक्‍युमेंटरी' बनविण्याची आयडिया लढवलीय आणि ती शंभर टक्के यशस्वी ठरलीय. "डॉक्‍युमेंटरी' या प्रकाराबद्दल गावकऱ्यांमध्ये असलेल्या प्रचंड कुतूहलाचा दिग्दर्शकानं विनोदनिर्मितीसाठी पुरेपूर वापर करून घेतलाय. त्याचं सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे फॉरेस्ट ऑफिसरची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अतुल कुलकर्णीलाच एका गावकऱ्यानं "डॉक्‍युमेंटरी' या नावानं हाक मारणं. अलीकडच्या काळात ग्रामीण भाषेचा अतिशय चांगला वापर झालेला चित्रपट म्हणून "वळू'चं नाव घ्यावं लागेल. व्यक्तिचित्रणातून हा चित्रपट पुढं सरकतो. छोट्या छोट्या व्यक्तिरेखाही सुरेख जमल्यानं पाहणारा त्यात स्वतःला गुंतवून टाकतो. या झाल्या सगळ्या जमेच्या बाजू. हा चित्रपट कमी पडलाय तो दोन-तीन गोष्टींमध्ये. एक तर चित्रपटाच्या वेगात सातत्य नाही. वळू हा काल्पनिक आहे की तो खरोखरीच अस्तित्वात आहे, याबद्दल दिग्दर्शकानं थोडं जास्तच रहस्य निर्माण केलंय. एकीकडे दिग्दर्शक एका वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूला हा बैल कारणीभूत असल्याचं सांगतो, तर दुसरीकडे काही गावकऱ्यांकडून त्याच्या निरुपद्रवीपणाचे किस्सेही ऐकवतो. त्यामुळे चित्रपटाच्या शेवटी खरा बैल पडद्यावर दिसल्यानंतर त्याच्या अस्तित्वाबद्दल एवढं कुतूहल निर्माण करण्यामागचं कारण कळत नाही. गावातला सरपंच आणि तरुण राजकारणी आबा (नंदू माधव) यांच्यातलं वैरही जिथं सुरू झालेलं पाहायलं मिळतं. त्याच्या पुढं काही केल्या ते जात नाही. गावातल्या भटजीवर केलेला विनोद चांगला असला तरी त्या व्यक्तिरेखेचं महत्त्व दिग्दर्शकाला टिपता आलेलं नाही.

अतुल कुलकर्णी, डॉ. मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, निर्मिती सावंत, भारती आचरेकर, अमृता सुभाष, ज्योती सुभाष, सतीश तारे, मंगेश सातपुते... अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात पाहायला मिळते. यापैकी काही कलाकारांच्या भूमिका लांबीच्या दृष्टीनं फार मोठ्या नाहीत, पण त्यांचा "ग्राफ' प्रत्येकानं खूप छान पकडलाय. कलाकाराचं त्याच्या अभिनयासाठी कौतुक केलं जातं, पण हे कलाकार त्यापेक्षाही जास्त कौतुकास पात्र आहेत. या चित्रपटामधल्या छोट्या व्यक्तिरेखांतील मोठा भाव त्यांनी बरोबर ओळखला, ही त्यांची खरी कमाई. छायाचित्रकार सुधीर पळसणे यांनी आपल्या कॅमेऱ्याद्वारे चित्रपटाचा विलक्षण "लुक' बदललाय.

Tuesday, February 5, 2008

बहुरूपिया : श्रेयस तळपदे मुलाखत



1995 मध्ये तू इंडस्ट्रीत पदार्पण केलंस; पण तुला खरा "ब्रेक' मिळण्यासाठी 2004 पर्यंत वाट पाहावी लागली. या काळातील तुझा स्ट्रगल कसा होता ?
- हिंदी चित्रपटांमध्ये "लीड'ची भूमिका करण्याचं माझं स्वप्न होतं; पण त्यासाठी कुणी तरी "गॉडफादर' असावा लागतो. मला तसा कोणी "गॉडफादर' नव्हता. मिळणाऱ्या प्रत्येक संधीचं सोनं करायचं होतं. त्यासाठीच मी सातत्यानं प्रामाणिकपणे मेहनत करीत होतो. या "स्ट्रगल'च्या काळात माझ्यापेक्षा जास्त त्रास झाला असेल तो माझ्या आई-वडिलांना. कॉलेज संपल्यानंतर सर्वांचा एकच प्रश्‍न असायचा की श्रेयस काय करतोय? त्यांचं उत्तर असे की, मी नाटक करतोय. या उत्तरानं समाधान न झालेले पुन्हा विचारायचे, नाटक करतोय म्हणजे नक्की काय करतोय? त्यावेळी आई-वडिलांची पंचाईत व्हायची. सुरुवातीचा काळ खूपच कठीण होता. काही दिग्दर्शक माझ्याकडे लक्षही देत नव्हते; पण आता तेच दिग्दर्शक मला दिवसातून चार-चार वेळा फोन करताहेत. तरीही मी मोठा झालोय असे मला मुळीच वाटत नाही; पण हा "स्ट्रगल' संपू नये, असं मला वाटतं. कारण एकदा का आपल्याला सारं काही येतं असं वाटू लागलं, की आपली प्रगती तिथेच थांबते.

: कोणत्याही कलाकाराच्या दृष्टीनं त्याच्या शेवटच्या चित्रपटाचा "रिझल्ट' खूप महत्त्वाचा असतो. "बॉम्बे टू बॅंकॉक'चं अपयश तू कसं पचवलंस?
- अपयशही कधी कधी आवश्‍यक असतं. त्यातून तुम्ही सक्षम होत असता. मी नाटकं-मालिका केल्या; पण योग्य संधी मिळायला तसा काळही यावा लागतो. "इक्‍बाल' व "डोर'मुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत; पण कोणत्याही चित्रपटाला मी एका पॉईंटपर्यंतच पुढं नेऊ शकतो. तो चित्रपट चांगला चालण्यासाठी स्क्रीप्ट, संगीत, दिग्दर्शन... असे सर्वच घटक मजबूत असावे लागतात. "बॉम्बे टू बॅंकॉक'ला समीक्षकांनी; तसेच प्रेक्षकांनीही नाकारलं. एका प्रेक्षकानं तर मला कॉमेडीची काहीच समज नसल्याचीही प्रतिक्रिया दिली. ही प्रतिक्रिया मी खूप "पॉझिटिव्ह'ली घेतलीय.

: सुभाष घईंसारख्या दिग्गज दिग्दर्शकानं जेव्हा "इक्‍बाल'ची "ऑफर' दिली, तेव्हा तुझी "फर्स्ट रिऍक्‍शन' काय होती?
- सुभाष घईंनी मला "इक्‍बाल'च्या ऑडिशनसाठी बोलावलं, तेव्हा मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की मला "लीड'चा रोल मिळणार आहे. असेल छोटीशी भूमिका वाटलं. पुढं मला सांगण्यात आलं, की 50 दिवस शूटिंग करायचं आहे. तेव्हा मला ही गोष्ट उमगली.

: तुझ्या नावाचीही चित्रपटसृष्टीत बरीच चिरफाड केली जाते. त्याबद्दल काय सांगशील?
- हिंदी चित्रपटसृष्टीत स्थिरस्थावर व्हायचं तर त्यासाठी नावही तसंच खणखणीत लागतं. माझ्या नावाची अनेक जण आपापल्या परीनं "वाट' लावतात. मला त्याचं मुळीच वाईट वाटत नाही. हे काही जाणूनबुजून होत नाही. सुभाष घईंनी तर मला सांगितलं होतं, की तू तुझं नाव "मानवकुमार' असं लाव; पण मी त्यांना स्पष्ट सांगितलं की, ज्या नावानं मी जन्माला आलोय, त्याच नावानं मला राहायचं आहे, वावरायचं आहे.

: शाहरूख खानबरोबर "स्क्रीन शेअर' करणं हे प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्न असतं. "ओम शांती ओम'च्या निर्मितीदरम्यान तुझी त्याच्याबरोबर खूप छान "केमिस्ट्री' जुळली होती. त्याबद्दल काही सांगशील का?
- फराह खाननंच मला विचारलं होतं, की शाहरूखबरोबर काम करशील का? त्यावेळी मला टेन्शन होतं. ही दोन्ही चांगली माणसं आहेत. त्यांच्यात खोटेपणा नाही... फराहनं मला स्पष्ट सांगितलं, की नागेश कुकुनूरपेक्षा अधिक आणि करण जोहरपेक्षा कमी असा मला "टेम्पो...' हवा आहे. पहिल्याच दिवशी शाहरूखला नाराज करायचं नाही असं मी ठरवलं होतं. "इस पार किंवा उस पार' असं ठरवून मी थेट शाहरूखशीच संवाद साधला. पहिल्या एक-दोन दिवसांमध्येच आम्ही अभिनयात एवढं "इम्प्रोव्हायझेशन' केलं, की शेवटी फराहला त्यात हस्तक्षेप करावा लागला. गेल्या वर्षी "ओम शांती ओम'च्या सेटवर त्यानं माझा वाढदिवस खूप अनोख्या पद्धतीनं साजरा केला होता.

: सुभाष घई, शाहरूख खान, फराह खान यांचा उल्लेख तू "गॉडफादर' असा करशील का?
- शाहरूख खानचा उल्लेख "गॉडफादर' म्हणून करावा, की चांगला "ह्यूमन बिईंग' म्हणून करावा ते मला कळत नाही, पण एक मात्र निश्‍चित, तो अतिशय चांगला मित्र आहे. मला त्या अर्थाने गॉडफादर मिळाले नाहीत; पण चांगली माणसे व मित्र पुष्कळ मिळाले.

: अमिताभ बच्चन यांना तुझा "इक्‍बाल' खूप आवडला होता. त्यावेळी त्यांनी दिलेली प्रतिक्रिया तू सांगशील?
- "आयफा' पारितोषिकासाठी मी नागेश कुकुनूरबरोबर दुबईला गेलो होतो. त्यावेळी लिफ्टमधून बाहेर पडताना मला अगदी जवळून अमिताभजींना पाहण्याचा योग आला. मी किती तरी वेळ मान वर करून त्यांनाच न्याहाळत होतो. ते नागेशबरोबर बोलताना त्यांनीच मला प्रश्‍न केला, "श्रेयस, सो गुड टू सी यू. व्हेन डिड यू कम?' पण माझ्या तोंडातून त्यांच्याशी बोलायला शब्दच फुटत नव्हते. मी मात्र "आय... आय... केम... समटाईम बॅक...' असं काही तरी बडबडलो. "आय... आय...' वरच मी बराच वेळ अडखळलो होतो. "आँखे' चित्रपटात मला त्यांच्याबरोबर दोन "सीन्स' करायला मिळणार होते. माझ्यासाठी सीन किती आहेत, यापेक्षा बच्चन यांच्याबरोबर काम करायला मिळणं, ही गोष्ट अधिक महत्त्वाची होती. दुर्दैवानं या दोनपैकी एक "सीन' "एडिटिंग'च्या वेळी कापला गेला.

: "ऍक्‍टर' म्हणून स्वतःला "एस्टॅब्लिश' करण्याची तुझी प्रक्रिया सुरू आहे. अशा स्थितीत "कांदे पोहे'चा निर्माता बनून तू थोडी "रिस्क' घेतोस, असं तुला वाटत नाही का?
- खरंय. "ऍक्‍टर' म्हणून मी अजूनही "एस्टॅब्लिश' झालेलो नाही. त्यामुळे, घईंनी "कांदे-पोहे'च्या निर्मितीचा पहिल्यांदा प्रस्ताव ठेवला, तेव्हा तो स्वीकारण्याच्या मी मनःस्थितीत नव्हतो. निर्माता म्हणून जबाबदारी घेण्यास मी अजूनपर्यंत तयार नसल्याचं मी त्यांना सांगितलं. तेव्हा त्यांनी आणखी किती वर्षांनी तू तयार होशील, असा प्रश्‍न विचारला. त्यांचा आग्रह आणि प्रोत्साहनामुळे मी अखेर निर्माता बनण्यास तयार झालो. निर्माता झाल्यानंतर मराठी कलाकारांचा फायदा करून देण्याचा माझा विचार आहे. मराठी कलाकारांकडे प्रचंड क्षमता आहे. आपली मुलं हिंदीतील कलाकारांपेक्षा शतपटीनं चांगली आहेत.

: अभिनेता आणि निर्माता अशा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळताना तुझी कितपत ओढाताण होतेय?
- मी सेटवर गेलो तर ओढाताण होणार ना. निर्मितीची सगळी धुरा माझी पत्नी दिप्ती तळपदे पाहतेय. या चित्रपटाच्या निर्मितीचा सर्व भार तिनं तिच्या खांद्यावर घेतलाय.: भविष्यात कुठंपर्यंत मजल मारण्याची महत्त्वाकांक्षा आहे?- जगातल्या लोकांनी मला ओळखावं, जागतिक सिनेमात मला काम करायला मिळावं हे स्वप्न आहे. तशा संधीसुद्धा येताहेत. माझ्याकडं चालून येणाऱ्या प्रत्येक संधीला मी "फूल टू' भिडणार आहे.