Friday, April 4, 2008

रंगतदार भाऊबंदकी


रंगतदार भाऊबंदकी

नात्यांमधली फसवणूक, खुनांची मालिका व लैंगिकतेकडे झुकणारा मालमसाला असला, की अब्बास-मस्तान ही दिग्दर्शकांची जोडी खुलते. या दिग्दर्शकद्वयीचा नवीन "रेस' चित्रपट पाहताना नेमका हाच अनुभव येतो. प्रेक्षकाची उत्सुकता शेवटपर्यंत ताणून धरण्याचा आणि त्याला अडीच तास खिळवून ठेवण्याचा सगळा मालमसाला या चित्रपटात भरलाय. म्हणूनच हा चित्रपट डोक्‍याला फारसा ताप न देता पाहणाऱ्यांचं छान मनोरंजन करतो;
पण दिग्दर्शकद्वयीनं काही गोष्टींबाबत अधिक काळजी घेतली असती, तर ही शर्यत आणखी रोमहर्षक ठरली असती. एक तर या चित्रपटामधल्या सर्वच व्यक्तिरेखा खूपच चलाख दाखविल्या आहेत. त्यामुळे त्यांची प्रत्येक हालचाल संशयास्पद वाटते. रहस्याचं जाळं अधिक गडद करण्यासाठी वापरलेल्या क्‍लृप्त्यांचा शेवटी शेवटी प्रचंड कंटाळा येतो. मध्यंतरालाच मुख्य हीरोचा खून दाखवून दिग्दर्शकानं धक्का देण्याचा प्रयत्न केलाय; पण हा धक्का थोडा "धीरे से'च लागतो. कारण- हा हीरो पुन्हा परतणार, याची पाहणाऱ्याला खात्री असते. प्रेक्षकांना असं वाटणं हाच रहस्यपटांमध्ये "मास्टरी' असणाऱ्या अब्बास-मस्तान यांच्यासाठी मोठा धक्का आहे.
रणवीर (सैफ अली खान) व राजीव (अक्षय खन्ना) या दोन सावत्र भावांमधल्या भाऊबंदकीवर हा चित्रपट आधारलाय. वडिलांनी मृत्युपत्रात आपली सगळी संपत्ती रणवीरच्या नावानं केलेली असते. रणवीरचं राजीववर मनापासून प्रेम असतं; परंतु त्याचं प्रेम राजीव ओळखू शकत नाही. प्रेमाचा हा धागा त्याच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. म्हणूनच हा धागा तोडण्याचा तो निर्णय घेतो आणि एका रंगतदार खेळाला सुरुवात होते. सोफिया (कतरिना कैफ), सोनिया (बिपाशा बसू), आरडी (अनिल कपूर) हे तिघे जण या खेळातले महत्त्वाचे खेळाडू. सोफिया ही रणवीरची सेक्रेटरी. तिचं त्याच्यावर एकतर्फी प्रेम असतं. सोनिया ही प्रसिद्ध मॉडेल. पहिल्याच भेटीत ती रणवीरच्या नजरेत भरते; पण राजीवसाठी तो तिच्या आयुष्यातून दूर जातो. इकडे सोनियाशी विवाह करून रणवीरचा पत्ता कापण्यासाठी राजीव सज्ज होतो. या खेळात मग कोणाला कशाचंच भान उरत नाही. नाती, मूल्यं पायदळी तुडवायलाही ही मंडळी कमी करीत नाहीत.
"रेस'चं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा प्रचंड वेग. या चित्रपटात एकापाठोपाठ घडणाऱ्या घटना पाहणाऱ्याला विचार करायलाच अवधी देत नाहीत. चित्रपटाची गोष्ट रंगतदारपणे सांगण्यात अब्बास-मस्तान यांचा हातखंडा आहे. या चित्रपटातही त्यांनी कथानकाला मोठ्या प्रेमानं फुलवलंय. रणवीर, राजीव, सोनिया व सोफिया या चारही व्यक्तिरेखांची उभारणी लक्षणीय आहे. सोनियाचा उलगडलेला भूतकाळ रंजक आहे. रणवीर व राजीव यांच्यातील शह-काटशहाचा खेळ सुरुवातीला खूप छान होतो; पण कोणत्याही गोष्टीला एक शेवट असतो याचं दिग्दर्शकाला भान राहिलेलं नाही. रणवीर-राजीवनी एकमेकांवर केलेल्या कुरघोडीचा खेळ जास्त लांबल्यानं त्यातली गंमत हरवलीय.
रणवीर ही चित्रपटामधली सर्वात महत्त्वाची व्यक्तिरेखा. त्याची मध्यंतराला हत्या झाल्याचं दाखविण्यात आलंय; पण नायकाचीच मध्यांतराला "एक्‍झिट' होणं शक्‍य नाही, याची पाहणाऱ्याला खात्री असते. दिग्दर्शकानं या गोष्टीकडे लक्ष दिलं असतं, तर हा चित्रपट अधिक परिणामकारक ठरला असता.
सैफ अली खान, अक्षय खन्ना, बिपाशा बसू, अनिल कपूर ही कलाकार मंडळी अभिनयात निष्णात आहेत. त्यामुळेच त्यांनी आपापल्या व्यक्तिरेखा अगदी सहजतेनं साकारल्यात. सुरुवातीच्या दृश्‍यांमध्ये प्रभाव पाडू न शकणारी कतरिना मध्यंतरानंतर चांगलं "फूटेज' घेऊन गेलीय. समीरा रेड्डीला काहीच वाव नाही. "रेस'ला मारक ठरलेली आणखी एक गोष्ट म्हणजे गाण्यांची संख्या. प्रीतमनं संगीतबद्ध केलेली फक्त दोनच गाणी चांगली आहेत. चित्रपटाचा "लूक' जबरदस्त आहे. हिंदी चित्रपटांच्या इतिहासात कधी पाहिलेलं नसेल एवढं थरारक "कार-रेसिंग' या चित्रपटात पाहायला मिळेल.

No comments: