Tuesday, April 15, 2008

आरपार भिडणारा टिंग्या...



तमाम प्रेक्षकवर्ग "वळू'च्या जादूतून अजून पुरता बाहेर येण्याच्या अगोदरच "टिंग्या' हा चित्रपट प्रेक्षकांना आरपार भिडण्यासाठी मंगेश हाडवळे नावाचा तरुण दिग्दर्शक आपल्या "टिंग्या' या कलाकृतीद्वारे प्रेक्षकांवर गारूड घालण्यासाठी सज्ज झालाय. हा चित्रपट पाहिल्यानंतर सर्वप्रथम मनात येणारी गोष्ट म्हणजे बैलांना खरंच सध्या चांगले दिवस आलेत. "वळू' चित्रपटातला बैल हा मुक्त स्वातंत्र्यावर भाष्य करून गेला. या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या "टिंग्या'तला बैल हा त्याउलट आहे. सध्याच्या असंवेदनशील आणि "प्रॅक्‍टिकल' समाजाचा तो बळी ठरतो. दिग्दर्शक मंगेश हाडवळे यांनी टिंग्या या सात-आठ वर्षांच्या मुलाच्या नजरेतून या बैलाचं बळी जाणं अत्यंत संवेदनशीलपणे चित्रीत केलंय. त्यातून उभं राहतं ते सध्याचं वास्तव. हा चित्रपट पाहणाऱ्याच्या अगदी आरपार भिडतो. त्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे विषयातला सच्चेपणा, हाताळणीतला साधेपणा आणि मराठी भाषेचा ग्राम्य गोडवा. हा चित्रपट सुरू झाल्यानंतर पाहणाऱ्याला अवघ्या काही मिनिटांमध्ये एका अद्‌भूत दुनियेत घेऊन जातो. तिथलं जीवन कधी हसवतं, कधी डोळ्यातून पाणी आणतं तर कधी आपल्या बोथट संवेदनांवर मार्मिक भाष्य करून जातं. चित्रपट माध्यमाची विलक्षण ताकद अधोरेखित करण्याचं काम या चित्रपटानं केलंय.
ही कहाणी आहे टिंग्या आणि चितंग्याची. टिंग्या म्हणजे आठ वर्षांचा एक निरागस चुणचुणीत मुलगा आणि चितंग्या म्हणजे त्याच्यासोबतीनं जन्मानं आलेला एक बैल. टिंग्याचे वडील एक कष्टकरी शेतकरी. सावकाराचं वाढत जाणारं कर्ज, त्यावर व्याजाचा बोजा आणि लहरी हवामानामुळं त्यांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चाललेली असते. त्यातच चितंग्या एका अपघातामुळं आपली शक्ती हरवून बसतो. तेव्हा आपलं कुटुंब चालविण्यासाठी या चितंग्याला
विकण्याशिवाय टिंग्याच्या वडिलांकडं दुसरा पर्याय नसतो. ही गोष्ट कळल्यानंतर टिंग्या संपूर्ण घर डोक्‍यावर घेतो. एवढ्यावरच न थांबता तो चितंग्यावर उपचार करण्यासाठी एका डॉक्‍टरला गावातून पाचारण करतो. पण परिस्थितीच अशी उद्‌भवते की, चितंग्याचा बळी जातो.
पदार्पणाच्या चित्रपटातच मंगेश हाडवळे यांनी कथा-पटकथा-संवाद आणि दिग्दर्शन अशी चौफेर कामगिरी केलीय. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय गेली काही वर्षं नुसता गाजतोय. दिग्दर्शकानं या विषयावर थेट भाष्य न करता एका शेतकरी कुटुंबाची ससेहोलपट दाखवलीय. या चित्रपटाचा मूळ विषय एक मुलगा आणि बैलातल्या नातेसंबंधाशी निगडीत आहे. हा विषय तर या चित्रपटात प्रभावीपणे उतरलाच आहे. त्याशिवाय ग्रामीण जीवनातल्या विविध रंगांची इथं उधळण झालीय. टिंग्याच्या शेजारी राहणाऱ्या एका मुस्लिम कुटुंबाचं केलेलं चित्रीकरणही खूप मार्मिक आहे. एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी असूनही काही त्रुटी राहून गेल्या आहेत. टिंग्या आणि त्याच्या मैत्रिणीबरोबरचं नातं दिग्दर्शकानं उगीचच तुटेल एवढं ताणलंय. टिंग्याला मोठं करण्याच्या प्रयत्नात त्याच्याहून काही वर्षंच मोठा असणारा त्याचा भाऊ अगदीच दुर्लक्षित राहून गेलाय. टिंग्याच्या व्यक्तिरेखेतलं महत्त्व लक्षात आल्यानं दिग्दर्शकानं त्याला काही दृश्‍यांमधून आणखी मोठं करण्याचा प्रयत्न केलाय. फ्लॅशबॅकच्या तंत्रात नसलेली सफाई प्रकर्षानं जाणवते. पण, चित्रपटाच्या एकंदरीत परिणामच्या तुलनेत या त्रुटी अगदी क्षुल्लक आहेत.
शरद गोयेकर हा बालकलाकार आपल्या करियरच्या सुरुवातीलाच थोर कामगिरी करून गेलाय. कॅमेऱ्यासमोरची त्याची एवढी सफाईदार कामगिरी बुचकळ्यात टाकणारी आहे. सचिन देव (वडील), माधवी जुवेकर (आई), तरन्नुम पठाण (रशिदा), चित्रा नवाथे (नानी), विठ्ठल उमप (नानीचा पती) या सर्व कलाकारांनी टिंग्याला चांगली साथ दिलीय. जो आशय चार-पाच गाण्यांमधून सापडणार नाही, तो आशय "मांझं आभाळ तुला दे... तुझं आभाळ मला...' या ओळीतून सांगण्यात दिग्दर्शकाला यश आलंय. तेव्हा या सुट्टीचं पहिलं काम म्हणजे "टिंग्या' पाहणे.

1 comment:

Anonymous said...

Bollyline, Can I get VALU and TINGYA online.

I need to see both these movies.

Being out of India, I am not able to get its DVD in the market. I will have to d/w from net only.

plz give me the link from I can d/w these b'ful movies.