Saturday, April 26, 2008

हिंदीत "व्हिलन' साकारायचाय...


मराठी चित्रपट, रंगभूमी आणि मालिका या तीनही क्षेत्रांमध्ये लीलया वावरणारा कलाकार म्हणजे अशोक शिंदे. सध्या एकीकडे या कलाकाराचे गावरान मराठी चित्रपट जत्रे-यात्रेत जोरदार व्यवसाय करताहेत, तर दुसरीकडे तो "एवढंसं आभाळ'सारखा चित्रपट आणि "असंभव'सारख्या मालिकेमधून "क्‍लास' प्रेक्षकवर्गालाही पसंत पडतोय. वयाची चाळिशी पार केल्यानंतर तो आता हिंदी चित्रपटात "मेन व्हिलन' साकारण्याचं स्वप्न पाहतोय.
--------------
"स्ट्रगल' या शब्दाचा अर्थ माहिती करून घ्यायचा असेल तर अशोक शिंदेची "करियर' त्यासाठी "बेस्ट' ठरावी. गेल्या दोन दशकांमध्ये या कलाकारानं अनेकदा पुनरागमन केलंय. शिक्षणानं बी. ई. इलेक्‍ट्रॉनिक्‍स असलेल्या या कलाकाराची अभिनयातील पहिली कामगिरी म्हणजे "अपराध मीच केला' हे नाटक. स्मिता तळवलकर आणि बाळ धुरी यांच्या या नाटकात प्रमुख भूमिका होत्या. अविनाश खर्शीकर याचीही या नाटकात प्रमुख भूमिका होती; मात्र ऐन प्रयोगावेळी तो आजारी पडल्यानं हा "रोल' अशोकच्या वाट्याला आला. अंगभूत गुणवत्तेच्या आधारावर अक्षरशः प्रयोगावेळच्या बस प्रवासात अशोकनं आपले संवाद पाठ केले आणि या नाटकाचे दहा प्रयोग यशस्वी करून दाखविले.
वास्तविक या क्षणी अशोक शिंदेच्या "करियर'नं भरारी घ्यायला हवी होती, परंतु प्रत्यक्षात तसं घडलं नाही. याबद्दल तो म्हणतो, ""या नाटकामधलं माझं काम पाहून राम कदमांनी एका नवीन चित्रपटाची मला "ऑफर' दिली. या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं आणि काही काळानं हा चित्रपट रखडला. प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांची एके दिवशी भेट झाली. ते मला म्हणाले, "अशोक, सध्या किती चित्रपट करतोयस?' मी म्हटलं, "फक्त रामभाऊंचा चित्रपट करतोय!' त्यावर ते पुन्हा म्हणाले, "मग लगेच दुसरा चित्रपट कर. कारण रामभाऊंची ख्याती अशी आहे की, ज्यांना त्यांनी पदार्पणाची संधी दिली, त्यांचे चित्रपट अद्यापपर्यंत पडद्यावर आलेले नाहीत.' (यशवंत दत्त-"मीठ भाकर', नाना पाटेकर-"गड जेजुरी जेजुरी'). पाटेकरांचं बोलणं खरं ठरलं आणि रामभाऊंचा चित्रपट रखडला. त्यामुळे चित्रपटसृष्टीतल्या पदार्पणासाठी मला "रेशीमगाठी' चित्रपटाची वाट पाहावी लागली. हा प्रेमपट अपयशी ठरल्यानं माझी निराशा झाली. त्यानंतर "एकापेक्षा एक'मध्ये मला छोटासा "रोल' मिळाला. हा चित्रपट अपयशी ठरला, पण या चित्रपटात बरीच कलाकार मंडळी असल्यामुळं यशाचं "शेअरिंग' झालं.''
कधी कधी कलाकाराच्या दृष्टीनं त्याची "इमेज' बनणंही आवश्‍यक असतं, पण आपली कधी कसलीच "इमेज' न बनल्याची खंत अशोक व्यक्त करतो. याबद्दल तो सांगतो, ""माझा "स्ट्रगल' इतर कलाकारांसारखा नव्हता. काम मिळण्याचं मला कधीच "टेन्शन' नव्हतं. मला माझ्या मनाजोगतं काम मिळत नव्हतं. एका चित्रपटात मी "हीरो' असायचो, तर दुसऱ्यात "व्हिलन'. मला अजूनही आठवतं, पुण्यात "प्रभात' चित्रपटगृहात मी "हीरो' असलेला "सुखी संसाराची बारा सूत्रं' हा चित्रपट लागला होता. या चित्रपटात अशोक सराफ यांनी माझ्या वडिलांची व्यक्तिरेखा साकारली होती. "प्रभात'पासून काहीच अंतरावर असलेल्या "विजय' चित्रपटगृहात अशोक सराफ "हीरो', तर मी "व्हिलन'च्या भूमिकेत होतो. देवाच्या कृपेनं मला चांगले पैसे मिळत होते. पण काही केल्या माझं काम "रजिस्टर' होत नव्हतं. अशा मनस्थितीत काम करणं खूप अवघड असतं. विश्‍वास बसणार नाही, तब्बल 17-18 वर्षं मी कार्यरत होतो. फक्त एकाच आशेवर, एक दिवस माझा येईल.''
अशोक शिंदेच्या आयुष्यात तो दिवस अगदी अलीकडे आला. "एवढंसं आभाळ' हा चित्रपट आणि "असंभव' मालिकेमुळं या कलाकाराला चोखंदळ प्रेक्षकांकडून जी पसंती हवी होती, ती मिळाली. ""काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या एका खूप नाव असलेल्या हॉस्पिटलमध्ये माझं जाणं झालं. एक प्रथितयश डॉक्‍टर माझ्याजवळ आले आणि म्हणाले, "तुमचा भालचंद्र राव मला खूप आवडतो.' त्यांची ही प्रतिक्रिया मला क्षणभर खरीच वाटली नाही. या व्यक्तिरेखेमुळं मला जगभरातील प्रेक्षक मिळाला,' अशोक सांगतो. "" "एवढंसं आभाळ'मध्ये तर माझं मध्यांतरानंतर आगमन झालं. तरीदेखील ही व्यक्तिरेखा मला खूप काही देऊन गेली. या दोन कलाकृतींनी माझं आयुष्यच बदलून गेलंय. मानसिंग पवारांनी मधे मला एका चित्रपटाची "ऑफर' दिली. त्यामध्ये एक 21 वर्षांची नायिका काम करीत आहे. तेव्हा तिच्यासोबत माझी जोडी पडद्यावर शोभेल का, असा प्रश्‍न मी त्यांना विचारला. त्यावर ते मला म्हणाले, की 44 वर्षांच्या शाहरूख खानबरोबर 21 वर्षांची दीपिका पदुकोण शोभून दिसते, मग तुला 21 वर्षांची नायिका "सूट' का नाही होणार? धंद्याच्या गणितात तू पडू नकोस. तेव्हापासून मी फक्त माझ्या व्यक्तिरेखेकडे लक्ष देतोय.''
गेल्या वर्षभरात अशोक शिंदेला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तिरेखा "ऑफर' होत आहेत. याबद्दल तो म्हणतो, ""सुमित्रा भावे, "श्‍वास'फेम मोहन परब, महेश मांजरेकर माझ्यासोबत चित्रपट करण्यास इच्छुक आहेत. वर्षभरापूर्वी कोणी मला असं सांगितलं असतं, तर त्यावर माझा विश्‍वासच बसला नसता. एका मित्रानं तर मला थेट सांगूनच टाकलं की, अशोक, आता जत्रेत चालणारे चित्रपट करूच नकोस, पण खरं सांगू, मला आता वेगळं काम करायचं असलं तरी या चित्रपटांना मी नकार देऊ शकणार नाही. कारण "भक्ती हीच खरी शक्ती' या चित्रपटानं 90 लाखांचा व्यवसाय केला. "जय अठरा भुजा सप्तशृंगी माता' हा चित्रपट नाशिकमध्ये चार "शोज'मध्ये तब्बल 14 आठवडे चालला. "भाऊ माझा पाठीराखा' या चित्रपटानंही चांगली कमाई केलीय. मला आता काहीतरी वेगळं करायला मिळतंय म्हणून मी अशा प्रकारच्या चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या निर्मात्यांना परत पाठवणं अयोग्य ठरेल. मराठी चित्रपट, मालिकांमध्ये मला चांगलं यश मिळालंय. मला आता वेध लागलेत ते हिंदी चित्रपटाचे. यापूर्वी मी "यशवंत' या एकमेव हिंदी चित्रपटात अवघ्या एका दृश्‍यामध्ये पाहायला मिळालो होतो. पुढील काळात हिंदी चित्रपट मिळवण्याकडे माझा कल राहील. सध्या नामांकित हीरोंपुढं ताकदीनं उभा राहील असा "व्हिलन' दिसत नाही. ती "गॅप' मला भरून काढायचीय.''

No comments: