Saturday, April 12, 2008

काजोल मुलाखत



बॉलिवुड सम्राज्ञी होण्याची गुणवत्ता आणि संधी असूनही काजोलनं दशकभरापूर्वी या क्षेत्रातून काही काळासाठी दूर होण्याचा निर्णय घेतला. दोन वर्षांपूर्वी "फना'द्वारे तिनं केलेलं पुनरागमन चांगलंच यशस्वी ठरलं होतं. आता ती आपला पती अजय देवगणचं दिग्दर्शन पदार्पण असलेल्या "यू मी और हम' चित्रपटाद्वारे रसिकांसमोर येतेय. त्यानिमित्तानं तिची ही दिलखुलास मुलाखत.
----------------
ग्लॅमर जगतामधली मुलाखत द्यायला न आवडणारी एकमेव अभिनेत्री म्हणजे काजोल ! कारकिर्दीच्या सुरुवातीला तिचा "मिडीया'शी बऱ्यापैकी "रॅपो' होता. पण, कालांतरानं विविध घटनांमुळं तिनं "मिडीया'ला आपल्यापासून दूरच ठेवलं. "फना'च्या प्रदर्शनावेळीही तिनं गप्प राहणंच पसंत केलं होतं. पण, अजयच्या दिग्दर्शकीय पदार्पणामुळं तिला आपलं मौनव्रत सोडावं लागलं. याबद्दल ती म्हणते, ""खरंच मला मुलाखती द्यायला आवडत नाहीत. त्याच त्याच प्रश्‍नांना काय उत्तरं द्यायची ? आपल्याजवळ काही सांगायला असेल तर बोलायला हरकत नाही. एक तर मी खूप कमी चित्रपट करते. तेव्हा उगीचच काही तरी बडबड करायला मला आवडत नाही. त्यापेक्षा मी गप्प राहणेच पसंत करते.''
अजयमध्ये लपलेल्या दिग्दर्शकाची जाणीव काजोलला पहिल्यांदा झाली. एके दिवशी अजयनं सहजच तिला गप्पा मारता मारता एक कथानक ऐकवलं. त्यावर दोघांनी भरपूर चर्चा केली आणि काही क्षणात काजोलनं त्याला आपण या चित्रपटात काम करणार असल्याचं सांगितलं. अजयच्या दिग्दर्शनाबद्दल ती सांगते, ""वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी त्यानं दिग्दर्शक व्हायचं स्वप्न पाहिलं होतं. ते स्वप्न आता पुरं झालंय, याचा त्याच्याबरोबर मलाही खूप आनंद वाटतो. अजयच्या दिग्दर्शनाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या विचारांमध्ये खूप स्पष्टता आहे. चित्रपट निर्मितीमधल्या प्रत्येक घटकाकडून नेमकं काय घ्यायला हवं, याची त्याला जाणीव आहे. एका चांगल्या दिग्दर्शकाची ही निशाणी आहे. "यू मी और हम' स्वीकारण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे अजयनं स्वीकारलेली दिग्दर्शनाची धुरा. अजयमध्ये चांगला दिग्दर्शक दडलाय, हे मला ठाऊक होतं. पण, तो "ग्रेट डिरेक्‍टर' असल्याची खात्री मला या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आली. माझ्या अपेक्षांपेक्षा कितीतरी पटीनं जास्त त्यानं दिग्दर्शक म्हणून छान काम केलंय. आतापर्यंत मी अनेक चांगल्या दिग्दर्शकांबरोबर काम केलं आहे. पण, प्रत्येक वेळी मला माझ्या भूमिकेबद्दल प्रश्‍न पडायचे. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे अजयनं मला माझी व्यक्तिरेखा अशापद्धतीनं ऐकविली की मला काम करताना एकही प्रश्‍न त्याला विचारावा लागला नाही.''
प्रेम या विषयावर आतापर्यंत अनेक चित्रपट आलेत. त्यामुळे, अजयनं "यू मी और हम'मधून प्रेमाबद्दल वेगळं काय भाष्य केलंय, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या विषयाबद्दल ती सांगते, "" "प्यार करने के लिए एक जुनून होता है । लेकिन प्यार निभाने के लिए भी एक जुनून जरूरी है ।' हीच गोष्ट आम्ही या चित्रपटातून सांगण्याचा प्रयत्न केलाय. आपण बऱ्याचदा छोट्या छोट्या गोष्टींचा उगीचच बाऊ करतो. योग्य मार्गानं समस्य सोडविण्याचा प्रयत्न केल्यास त्यात नक्की यश येतं. हा विचार या चित्रपटातून मांडण्यात आलाय.''
हिंदी चित्रपटसृष्टीत एखाद्या नायिकेचा विवाह झाला की, तिच्या "करियर'कडं कोणी गांभीर्यानं पाहत नाही. काजोलनं विवाहानंतर "दिल क्‍या करे', "कभी खुशी कभी गम', "राजू चाचा', "फना' आणि "यू मी और हम' हे पाच चित्रपट केले. दहा वर्षांमध्ये अवघे पाच चित्रपट करण्याच्या आपल्या निर्णयाचं समर्थन करताना ती सांगते, ""मी स्वतःला खूप "लकी' मानते. गेल्या दोन दशकांमध्ये मला खूप वेगवेगळे "रोल्स' करण्याची संधी मिळाली. अशी संधी यापूर्वी खूप थोड्या नायिकांच्या वाट्याला आलीय. मी माझ्या भूमिकांबाबत खूप "चुजी' आहे. तसेच माझ्या चित्रपट निर्मितीमधल्या प्रत्येक विभागाबद्दलच्या अपेक्षा खूप मोठ्या असतात. एक तर मला कथानक खूप वेगळं लागतं, दिग्दर्शकही खूप चांगला लागतो. माझ्याशी "कम्फर्टेबल' असतील अशा कलाकारांबरोबर मला काम करायचं असते. तेव्हा एवढ्या सगळ्या अटींमुळं माझा नवीन चित्रपट यायला तीन वर्षं लागतात. मात्र, त्याची मला खंत नाही. काहीतरी सुमार भूमिका करण्यापेक्षा तीन वर्षांनी एखादी मस्त भूमिका साकारायलाच मला अधिक आवडेल. प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे चित्रपट मला आवडतात. याचा अर्थ असा नाही की, समस्याप्रधान चित्रपट वाईटच असतात. पण, मी माझा स्वतःचा मार्ग निश्‍चित केलाय.''
गेल्या दोन दशकांमध्ये आपला अभिनय प्रगल्भ झाल्याचं काजोल अगदी ठामपणे सांगते. त्यासाठी ती शाहरुख खानचं उदाहरण देते. ती म्हणते, ""शाहरुखनं काही काळापूर्वी दिलेली एक मुलाखत माझ्या चांगली लक्षात आहे. यात तो म्हणाला होता, माझ्यासमोर एखादी गाय जरी उभी केली तरी मी तिला माझं तिच्यावर प्रेम आहे, हे पटवून देऊ शकेन. शाहरुख आणि आमिर खानच्या कामावरील निष्ठेला तोड नाही. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालंय. पण, जर कोणी मला अजय, शाहरुख आणि आमीर या तिघांपैकी एकाची सहकलाकार म्हणून निवड करायला सांगितलं तर मी तिघांनाही नकार देईन. कारण, माझ्यादृष्टीनं कथानक सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणून तर करण जोहरचा नवीन चित्रपट मी अजूनपर्यंत स्वीकारलेला नाही. मी त्याला तोंडी होकार दिलाय. पण, कथानक ऐकल्यानंतरच त्याचा चित्रपट स्वीकारायचा की नाही, हे मी ठरवीन. सध्या मी आमच्या "होम प्रॉडक्‍शन'चा "टुनपूर का सुपरहीरो' हा एकमेव चित्रपट करतेय.''
गेल्या पाच वर्षांत हिंदी चित्रपटसृष्टीत कमालीचा बदल झालाय. याची काजोलला कल्पना आहे. हा बदल धक्कादायक असल्याचं स्पष्ट करून ती सांगते, ""खरं तर मला हिंदी चित्रपटांमध्ये कामच करायचं नव्हतं. कारण, हे क्षेत्र खूप अस्थिर आहे. मला दर महिन्याच्या पहिल्या तारखेला पगाराचा चेक हवा होता. पण, कुटुंबियांनी मला या क्षेत्रात अक्षरशः ढकलून दिलं. पण, इथं काम करायला लागल्यानंतर हे क्षेत्र आपल्याला जेवढं वाईट वाटत होतं, तेवढं वाईट नाही, याची मला खात्री पटली.''

No comments: