Friday, April 25, 2008

प्रिय सचिन,

प्रिय सचिन,

सर्वप्रथम तुला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा!
मी काही क्रिकेटचा अभ्यासक नाही. गल्ली-क्रिकेटच्या वरदेखील माझी मजल गेलेली नाही! पण गेली 20 वर्षं टीव्हीवर क्रिकेट पाहून जे काही उमगलंय, ते तुझ्या करियरशी जोडून पाहण्याचा प्रयत्न करतोय.
दीड-दोन महिन्यांपूर्वीची गोष्ट. ऑस्ट्रेलियातील तिरंगी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत तू "बॅक टू बॅक' दोन इनिंग्ज छान खेळला होतास. तेव्हा मला काही मित्रांचे "एसएमएस' आले होते. "इफ क्रिकेट इज ए रिलिजन, देन सचिन इज अवर गॉड...', "आता तरी कळलं का तुला सचिनचं मोठेपण?...', "मराठी माणसानंच सचिनला पाठिंबा देऊ नये, यासारखं दुसरं दुर्दैव नाही...' या आशयाचे ते "एसएमएस' होते. ते वाचून मला धक्काच बसला. सगळं जग एकीकडं तुझं कौतुक करीत असतानाच माझ्यासारखे काही मोजकेच लोक तुझे कसे आणि केव्हापासनं एवढे कट्टर विरोधक बनले? थोडा खोलात जाऊन विचार केला तेव्हा काही गोष्टींचा उलगडा व्हायला लागला.
"युवा सकाळ'मध्ये सहा-सात वर्षांपूर्वी मी तुझ्यावर "आहे महान तरीही...' या शीर्षकाचा एक लेख लिहिला होता. तुझ्या दशकभराच्या करियरचा आढावा घेताना मी महत्त्वाचे सामने आणि अंतिम स्पर्धांमधील तुझ्या कामगिरीचा ताळेबंद मांडला होता. आकडे कधीही खोटं बोलत नसतात. त्याप्रमाणे या सामन्यांमधली तुझी कामगिरी निश्‍चितच तुझ्या "स्टॅंडर्ड'च्या जवळ जाणारी नव्हती. पण, हे वास्तव पचविणं जड होतं. तुझ्या अनेक चाहत्यांकडून तेव्हा मला हा लेख आवडला नसल्याची पत्रं आली होती. पण काही मोजक्‍या रसिकांनी, ही माहिती डोळे उघडायला लावणारी असल्याचंही म्हटलं होतं. तेव्हापासून मी तुझ्या कामगिरीवर बारकाईनं लक्ष ठेवून होतो. पण, याचा अर्थ असा नव्हे की, मी कधीच तुझ्या फलंदाजीवर प्रेम केलं नाही. इतरांप्रमाणेच मीसुद्धा तुझा विलक्षण फॅन आहे. तू आऊट झालास की, इतरांप्रमाणे मीसुद्धा चॅनेल बदलतो. पण, माझं तुझ्यावरील प्रेम आंधळं नाही. ते डोळस प्रकारात मोडणारं आहे.
अजूनही आठवतंय, पाकिस्तानच्या पहिल्याच दौऱ्यात तू ज्या धैर्यानं वासीम अक्रम, वकार युनूस या तोफखान्याला सामोरा गेलास, त्याला तोड नव्हती! "स्ट्रेट ड्राईव्ह' पाहावा तर तुझाच! ऑफ साईडला फ्रंट फूटवर जात तू मारलेले फटके कोणी विसरूच शकणार नाही. क्रीज सोडून पुढं नाचत येत तू लगावलेले सिक्‍सर डोळ्यांचं पारणं फेडणारे होते. क्रिकेटच्या पुस्तकात असलेल्या प्रत्येक फटक्‍याला तू आपलंसं तर केलंस; पण पॅडल स्वीपसारखे काही नवीन "इनोव्हशन' तुझ्या बॅटिंगमध्ये पाहायला मिळालं. तुझ्या फलंदाजीत अशी काही नजाकत होती की, तू एखादी ओव्हर खेळून काढली तरी चॅनेल बदलण्याचा मोह व्हायचा नाही. 1998च्या मार्चमध्ये शारजाच्या वाळवंटात तुझ्या बॅटनं जे वादळ निर्माण केलं, ते आजही कोणी विसरू शकलेलं नाही. एवढं सगळं चांगलं असूनही नंतर काहीतरी बिनसत गेलं. तुझा "डिफेन्स' सहज भेदला जाऊ लागला. तू बोलरला वाजवीपेक्षा अधिक सन्मान देऊन स्वतःची विकेट बहाल करू लागलास. "क्‍लीन बोल्ड' झाल्यानंतरही तू उगाचच चेंडू खाली राहिल्यानं मी चकलो, अशी ऍक्‍शन करून आपल्या चाहत्यांची सहानुभूती मिळवू लागलास. तुझ्यात दडलेल्या एका श्रेष्ठ स्पिनरला तू कधीच "सिरीयसली' घेतलं नाहीस. वॉर्न, मुरलीधरनप्रमाणे तूसुद्धा अगदी हातभर चेंडू वळवू शकतोस. पण... तुझ्या फलंदाजीतील श्रेष्ठत्वापुढं तुझ्यातला गोलंदाज झाकोळला गेला.
अनेक जण म्हणतात की, तू सचिनकडून खूप अपेक्षा ठेवतोस. त्यामुळे, या अपेक्षांची पूर्ती न झाल्यास तुझी निराशा होते. काही जण सांगतात, की दर वेळी सचिननंच खेळायला पाहिजे, ही जबरदस्ती का? टीममधले इतर दहा जण झोपा काढतात काय? प्रश्‍न रास्त आहेत. पण, या सवालांची सरबत्ती करणाऱ्यांनीच तुला देवाच्या जागी नेऊन बसवलंय, ही गोष्ट कशी नाकारता येईल? आणि जर तू देव असशील तर संकटाच्या वेळी तुझा तूच धावून यायला नकोस का?
आकडे तरी असे सांगतात की संकटसमयी तुझी फलंदाजी दबावाची शिकार झालीय. कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या डावातल्या फलंदाजीला खूप महत्त्व असतं. दुर्दैवानं तुझी चौथ्या डावातील कामगिरी तुझ्या लौकिकाला साजेशी नाही. तंत्राच्या दृष्टीनं तुझ्या फलंदाजीत कोणताही दोष नाही, तुझ्याजवळ पर्वताएवढा अनुभव आहे, कोणत्याही गियरमध्ये बॅटिंग करण्याची तुझी ताकद आहे, कोणताही बोलर तुला फार काळ "बॅक फूट'वर ठेवू शकलेला नाही. मग प्रश्‍न असा उपस्थित होतो की, तुझ्याकडून अपेक्षा नाही ठेवायच्या तर त्या कोणाकडून ठेवायच्या? अपेक्षांच्या ओझ्याखाली दीर्घ काळ आपल्या कामगिरीत सातत्य ठेवणं सोपं नाही, हे मी समजू शकतो. पण, याचीही तुला आता सवय झाली असावी.
कसोटी असो, वन डे असो की ट्‌वेंट्‌वी ट्‌वेंटी... क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात तू "फिट' आहेस. फलंदाजीतली तुझी गुणवत्ता पाहिली की कधी कधी वाटतं तू जर ठरवलंस तर कोणत्याच गोलंदाजाला तुझी विकेट जाणार नाही. क्रिकेटमधले बहुतेक सर्व विक्रम आता तुझ्या नावावर जमा आहेत. कसोटीमधील सर्वाधिक धावांचाही विक्रम लवकरच तुझ्या नावावर जमा होईल. तेव्हा माझ्यासारख्या चाहत्याला प्रश्‍न असा पडतो की, असं कोणतं "मोटिव्हेशन' आहे की, जे तुला अजूनही खेळायला भाग पाडतंय.
अलीकडच्या काळात तू अनेकदा झटपट बाद झाला असलास तरी तुझ्या विश्‍वासार्हतेला कधीच धक्का बसलेला नाही. आपली टीम बॅटिंग करीत असली की प्रत्येकाचा पहिला प्रश्‍न असतो, सचिन खेळायला आला का किंवा सचिननं किती रन्स काढले. आपली टीम संकटात असेल आणि तू क्रीजवर असलास तर "सचिन है ना!' असं प्रत्येकाचं उत्तर असतं. तुझी ही विश्‍वासार्हताच तुझं सर्वाधिक योगदान आहे. या योगदानाच्या बळावर तू आणखी काही यशोशिखरं गाठावीस अशी अपेक्षा आहे. पण, ते गाठताना तुझ्या लौकिकाला धक्का बसू नये, हीच अपेक्षा. तुझ्या फलंदाजीबाबत काही खटकलेल्या गोष्टी उपस्थित केल्या, त्याबद्दल क्षमस्व.
पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

तुझा चाहता,
मंदार जोशी

No comments: