Wednesday, April 23, 2008

भरभराट बॉलीवुडची

भारतामधील प्रसारमाध्यमं आणि मनोरंजन उद्योगाची सध्या अतिशय वेगानं भरभराट होतेय. "फिकी'च्या मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनाचं सूत्र या भरभराटीभोवतीच केंद्रीत होतं. भारतात तसेच जगभरात या दोन्ही क्षेत्रात काम करणारी तज्ज्ञ मंडळी या अधिवेशनास उपस्थित होती. यावेळी झालेल्या चर्चासत्रांमध्ये या दोन्ही क्षेत्रांची भविष्यातील प्रगती आणि त्या ओघानं येणाऱ्या आव्हानांवर प्रकाश टाकण्यात आला. त्याचा घेतलेला हा आढावा.
------------
"जब वुई मेट' हा गेल्या वर्षीचा एक उत्कृष्ट सिनेमा. त्यानं "बॉक्‍स ऑफिस'वर चांगला व्यवसाय केला. पण, या यशामागं दडलेली सोनेरी किनार सर्वांच्या नजरेस आणून दिली ती "सोनी'च्या कुणाल दासगुप्ता यांनी. गेल्या काही महिन्यांमध्ये या चित्रपटाच्या 80 लाख अधिकृत डीव्हीडींची विक्री झालीय. हिंदी चित्रपटांच्या सीडी तसेच डीव्हीडी विक्रीचा हा नवीन विक्रम मानला जातोय. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी टीव्हीवरील आपल्या चित्रपटाच्या प्रक्षेपणाचे हक्क विकतानाही चतुराई दाखविली. त्यांनी एकाच वाहिनीला आपल्या चित्रपटाचे हक्क न विकता वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळ्या वाहिन्यांना हे हक्क विकले. त्यामुळेच, फक्त टीव्हीवरील प्रक्षेपणाचे हक्क आणि डीव्हीडी विक्रीतूनच या चित्रपटानं निर्मितीखर्चाच्या तिप्पट रक्कम वसूल केली. नियोजनबद्ध निर्मिती केल्यास चित्रपटनिर्मितीचं क्षेत्र किती लाभदायक ठरू शकतं, याचं हे सर्वोत्तम उदाहरण आहे.
हल्लीच्या प्रेक्षकवर्गाची आवड खूप बदललीय, असं सगळीकडे बोललं जातं. या विषयावरच "चक दे इंडिया'फेम शिमीत अमीन, विधू विनोद चोप्रा, सुधीर मिश्रा यांनी प्रकाश टाकला. "चक दे...'सारखा विषय दोन वर्षांपूर्वी निर्मिलं जाणं शक्‍यच नव्हतं, असं अमीन यांनी सांगून टाकलं. सुधीर मिश्रा यांनी आपण प्रेक्षकांना नजरेसमोर ठेवून कधीच चित्रपटनिर्मिती करीत नसल्याचं स्पष्ट केलं. दिग्दर्शकानं आपल्याला जे काही सांगायचंय, ते ठामपणे सांगितलं तर वेगळ्या वाटेवरचा चित्रपटही चांगली होऊ शकतो. हा चित्रपट लोकप्रिय ठरला की मग प्रेक्षकाची आवड बदललीय, असं बोललं जाणं साहजिक असल्याचाही त्यांनी मुद्दा मांडला. विधू विनोद चोप्रांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रातील अनिश्‍चिततेवर भर दिला. "मुन्नाभाई एमबीबीएस' हा चित्रपट तयार झाला तेव्हा त्याला एकही वितरक हात लावण्यास तयार नव्हता. काहींनी तर आपणास असल्या चित्रपटाची निर्मिती करून कशाला हात पोळून घेताय ? असा प्रश्‍नही विचारल्याचं चोप्रांनी सांगितलं. अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला "एकलव्य-अ रॉयल गार्ड' हा चित्रपट भारतात अपयशी ठरला तर विदेशात त्यानं अतिशय चांगला व्यवसाय केला. प्रेक्षकांची आवड अशी भिन्न असताना दिग्दर्शकानं स्वतःला काय सांगायचंय, यावरच भर देणं आवश्‍यक असल्याचेही ते म्हणाले.
मनोरंजन उद्योगातील सर्वाधिक "हॅपनिंग' क्षेत्र म्हणून टीव्ही माध्यमाकडंच पाहिलं जातंय. सध्या भारतात एकूण 313 वाहिन्यांचं प्रक्षेपण सुरू असून 80 वाहिन्यांचे अर्ज केंद्र सरकारकडं पडून आहेत. आगामी पाच वर्षांमध्ये आणखी सहाशे वाहिन्या पदार्पणाच्या तयारीत आहेत. केबलजोडणी असलेल्या घरांमधल्या सुमारे शंभर वाहिन्यांचं "सर्फिंग' करतानाच अनेकांना सध्या नाकीनऊ येतंय. तेव्हा या एक हजार वाहिन्या कोण पाहणार आणि त्यांचं भवितव्य काय ? हा एक मोठा प्रश्‍न आहे. मात्र, "आयएनएक्‍स मिडीया'च्या पीटर मुखर्जी यांच्या मतानुसार या सर्व वाहिन्या आपल्या पोटात रिचवण्याची क्षमता सध्या भारतीय दूरचित्रवाहिनी क्षेत्रात आहेत. "कॅस'च्या (कंडिशनल ऍक्‍सेस सिस्टीम) अंमलबजावणीस सुरुवात झाली असली तरी अजूनही देशभरात केबलयंत्रणेचाच प्रभाव आहे. या "ऍनॉलॉग' यंत्रणेला हद्दपार करून "डिजिटल' यंत्रणेची स्थापना केल्यास प्रत्येकाला आपणास हवी ती वाहिनी पाहण्याचा अधिकार मिळणार आहे. त्यामुळेच सर्व प्रकारच्या "निश' (एखाद्या विशिष्ट विषयाला वाहिलेल्या) वाहिन्यांनाही चांगला प्रेक्षकवर्ग आणि पर्यायानं उत्पन्न मिळण्याची शक्‍यता आहे. प्रसारमाध्यमं आणि मनोरंजन क्षेत्राची व्याप्ती बघून केंद्र सरकारनं त्याबाबत एक कायमस्वरूपी धोरण निश्‍चित करण्याचा मुद्दा "रेडिओ मिर्ची'चे प्रमुख परिघी यांनी मांडला.
सध्या वृत्तवाहिन्यांची संख्या झपाट्यानं वाढतीय. भारतामधल्या टीव्हीचा चेहरामोहरा बदलण्यास वृत्तवाहिन्या जबाबदार असल्याचंही बोललं जातंय. "टीव्ही नेटवर्क टुडे'चे जी. व्ही. कृष्णन हे त्यास दुजेरा देतात. क्रिकेट, सिनेमा, कॉमेडी आणि क्राईम हे चार "सी' सध्या वृत्तवाहिन्यांवर राज्य करीत आहेत. "ट्‌वेंट्‌वी ट्‌वेंटी' स्पर्धेत भारतानं मारलेली बाजी, अभिषेक बच्चन-ऐश्‍वर्या रायचा विवाह आणि बेनझीर भुट्टो यांची हत्या... या तीन बातम्यांनी गेल्या वर्षभरात सर्वाधिक "टीआरपी' मिळविला. विशेष म्हणजे या तीनही बातम्या वेगवेगळ्या क्षेत्रांचं प्रतिनिधीत्व करतात. सर्वसामान्यांच्या हातात भरपूर पैसा खुळखुळत असल्यानं त्यांच्या आवडीनिवडीत प्रचंड फरक पडला असल्याचे मत "सहारा समय'च्या राजीव बजाज यांनी व्यक्त केलं. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येसारखा ज्वलंत प्रश्‍न टीव्हीवर पाहण्यात प्रेक्षकांना आता रस उरलेला नाही. या विषयावरील बातम्या दाखविल्यास त्याला प्रेक्षकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. म्हणूनच लोकांना जे हवंय, ते दाखविण्याशिवाय वाहिन्यांना पर्याय उरला नसल्याचंही तो सांगून टाकतात. मात्र, त्याविरुद्धचं मत "एनडीटीव्ही'च्या संजय अहिरराव यांनी व्यक्त केलं. "टीआरपी'च्या आकड्यांवर लक्ष ठेवून कार्यक्रम करण्याऐवजी सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांशी निगडीत असलेले विषयच भविष्यात आपल्या वाहिनीवरून सादर केले जातील, असं ते म्हणाले.
मालिका, मुलांसाठीचे कार्यक्रम, बातम्या, स्पोर्टस्‌... हा आतापर्यंतचा आपल्या टीव्हीचा पॅटर्न. मात्र, "आयएनएक्‍स'च्या संगीतविषयक वाहिनीनं मोठं यश मिळवून हा "पॅटर्न' मोडून काढला. बहुतेक सर्व वाहिन्या सध्या गाजलेल्या गाण्यांचं काही सेकंदापुरते प्रक्षेपण करतात. त्यामुळे प्रेक्षकांचा रसभंग होतो. ही गोष्ट लक्षात घेऊन या वाहिनीवर सर्व गाणी पूर्ण रूपात दाखविली गेली. संगीतावर प्रेम करणाऱ्या रसिकांनी अर्थातच या वाहिनीला आपला कौल दिला. "आमची वाहिनी म्हणजे टीव्हीवरचा रेडिओ आहे. मार्केटिंगवर एक पैसाही खर्च न करता यशस्वी झालेली ही एकमेव वाहिनी !' अशा शब्दांमध्ये मुखर्जी यांनी आपल्या यशामागचं गमक उलगडून दाखविलं. दूरचित्रवाहिन्या, चित्रपट, रेडिओबरोबरच सध्या "ऑनलाईन मिडीया'चाही बोलबाला आहे. भारतात सध्या वर्तमानपत्रं आणि टीव्हीचं वर्चस्व असलं तरी भविष्यकाळ हा "ऑनलाईन' माध्यमाचा असल्याचं भाकीत "एनडीटीव्ही नेटवर्क'च्या विक्रम चंद्रा यांनी वर्तविलं. भारतातल्या प्रसिद्धीमाध्यमांनी आता वेबसाईट हे माध्यम लोकाभिमुख करण्यावर भर दिला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. समाजात घडणाऱ्या घटनांचं केवळ वृत्तांकन करण्याऐवजी काही समस्यांची "कॅंपेन्स' राबविणं आता आवश्‍यक असल्याचेही ते म्हणाले. सर्वसामान्यांना आपला आवाज इतरांपर्यंत पोचविण्याचा "प्लॅटफॉर्म' वेब माध्यमानं उपलब्ध करून देणं गरजेचं आहे.
मनोरंजन क्षेत्राची एकीकडे भरभराट सुरू असताना दुसरीकडे या क्षेत्राला "टॅलेण्टेड' लोकांची उणीव भासत आहे. ती दूर करण्यासाठी शासकीय तसेच खासगी पातळीवरही प्रयत्न होणं आवश्‍यक असल्याचं मत "व्हिसलिंग वूडस्‌ इंटरनॅशनल'च्या मेघना घई यांनी व्यक्त केलं. चित्रपट-टीव्ही माध्यमातलं परिपूर्ण शिक्षण देण्यासाठी आपली संस्था प्रसिद्ध असली तरी ही संस्था संपूर्ण भारतामधल्या तरुणाईची गरज भागविण्यास अपुरी आहे. अमेरिकेत कलाक्षेत्राचं प्रशिक्षण देणाऱ्या सुमारे दोन हजारहून अधिक संस्था कार्यरत आहे. भारतात असं काम करणाऱ्या संस्थांची संख्या अगदी हाताच्या बोटांवर मोजता येण्याइतकी आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये महत्त्वाच्या घटनांचं "कव्हरेज' करताना माध्यमांनी दाखविलेला उतावीळपणा अनेकांच्या टीकेस पात्र ठरला होता. त्यामुळेच माध्यमं आणि त्यांना सामाजिक भान आहे की नाही ? यासारखे प्रश्‍न उपस्थित झाले होते. खरं तर या विषयावर चर्चा करण्यासाठी शर्मिला टागोर, श्‍याम बेनेगल, महेश भट, प्रितीश नंदी, केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याच्या सचिव जोहरा चटर्जी अशी दिग्गज मंडळी एकत्र आली होती. परंतु, यापैकी बहुतेकांनी मूळ मुद्दा सोडून सेन्सॉर बोर्डाची कार्यपद्धती आणि समाजातल्या काही घटकांनी चित्रपटांचे बंद पाडलेले प्रदर्शन यालाच "टार्गेट' केलं. "ब्रेकिंग न्यूज' हा हल्ली खेळ झालाय, हे बेनेगलांचं वक्तव्य सर्वांचा हशा घेऊन गेले.

भोजपुरीची भरारी
या अधिवेशनात प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांबद्दलचं चर्चासत्र विलक्षण रंगलं. महेश कोठारे यांनी हिरीरीनं मराठी चित्रपटसृष्टीची बाजू मांडली. भोजपुरी चित्रपटांचा सुपरस्टार मनोज तिवारीनं आपल्या चित्रपटसृष्टीच्या यशाचं केलेलं विश्‍लेषण उपस्थितांना थक्क करून टाकणारं ठरलं. या कलाकाराची प्रमुख भूमिका ?सलेल्या "ससुरा बडे पैसेवाला' या चित्रपटाचं बजेट होतं 29 लाख रुपये. पण, त्यानं व्यवसाय केला 40 कोटींचा. मनोजनं षटकार मारला तो "बिना स्क्रीप्ट के यहॉं काम चलता है ।' असं वक्तव्य करून. कोणत्याही भोजपुरी चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं की तब्बल 10-12 दिवसांनी कलाकारांना पटकथा मिळते. पटकथा हातात नसताना आम्ही कसं काम करतो, ते देव जाणं, असं मनोजनं सांगितलं.

सेन्सॉरची कैची
महेश भट यांची दिग्दर्शन क्षेत्रातील शेवटची कलाकृती म्हणजे जख्म. पण, हा चित्रपट पूर्ण करताना भटना सेन्सॉर बोर्डाशी मोठी टक्कर द्यावी लागली होती. चित्रपट पूर्ण होऊनही तो सेन्सॉर बोर्डामुळे तो रखडला होता. या चित्रपटातील "क्‍लायमॅक्‍स'बाबत सेन्सॉरचा आक्षेप होता. तेव्हा केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार होते. क्‍लायमॅक्‍समधील कार्यकर्त्यांची वेशभूषा बदलण्याचा अट्टाहास सेन्सॉरने धरला होता. तेव्हा तब्बल 40 लाख रुपये खर्च करून भटनी हा पाच मिनिटांचा भाग "एडिट' केला होता. विशेष म्हणजे चित्रपटाचे एकूण बजेट होतं 3 कोटी. यावरची कडी म्हणजे त्या वर्षीचा राष्ट्रीय एकात्मतेचा पुरस्कार म्हणून "जख्म'ची निवड झाली. अशा परिस्थितीत आपण मनोरंजनपर चित्रपट करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे, असा टोला भट यांनी मारला.

No comments: